मुंबई: दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उजेड आणि समृद्धीचे प्रतीक. प्रत्येक घरात लक्ष्मीपूजन, गोडधोड आणि भेटवस्तूंसोबत एक परंपरा कायम राखली जाते ती म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करण्याची. भारतीय संस्कृतीत या दिवशी सोने घेणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण असे मानले जाते की या दिवशी सोने खरेदी केल्याने लक्ष्मीदेवी घरात येतात आणि सुख-समृद्धी प्राप्त होते.
advertisement
मात्र यंदाची दिवाळी थोडी वेगळी ठरणार आहे. कारण सोने दरांनी या वर्षी आकाशाला गवसणी घातली आहे. वर्ष 2025 मध्ये प्रथमच सोने 4,000 डॉलर प्रति औंसच्या वर गेले आहे आणि त्यामुळे सामान्य खरेदीदारापासून ते गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे. धनतेरसला सोने खरेदी करावी का थांबावे?
या प्रचंड दरवाढीमागे दोन मोठी कारणे आहेत. पहिले म्हणजे, जगभरातील सेंट्रल बँकांकडून मोठ्या प्रमाणावर होत असलेली सोनेखरेदी. अनेक देश आपल्या चलनाचे संरक्षण करण्यासाठी आणि आर्थिक अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी सोने साठवू लागले आहेत. दुसरे कारण म्हणजे, अमेरिकन डॉलरचा कमकुवतपणा. डॉलरची घसरण झाल्यावर सोने नेहमीच महाग होते. कारण ते सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानले जाते.
पण अशा वेळी लोकांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. परंपरा पाळावी का पैशांचा विचार करावा? भारतात सोने खरेदी ही केवळ गुंतवणूक नाही, तर एक भावना आहे. किंमती कितीही वाढल्या तरी अनेक जण शुभ मुहूर्तावर थोडंसं का होईना, पण सोने विकत घेतात. काही लोक फक्त सोन्याची नाणी किंवा हलकी अंगठी, चैन किंवा कानातले विकत घेतात, ज्यामुळे परंपरा जपली जाते आणि खिशावर फारसा ताण येत नाही.
दुसरीकडे गुंतवणूकदारांच्या दृष्टीने सोने हे नेहमीच महागाईपासून संरक्षण देणारे माध्यम राहिले आहे. त्यामुळे अनेक लोक या काळात सोने आपल्या पोर्टफोलिओचा भाग म्हणून ठेवतात. मात्र यावर्षीचे दर पाहता तज्ज्ञांचे मत आहे की निव्वळ गुंतवणुकीसाठी घाई करू नये. सणानंतर सोनेखरेदीची मागणी कमी झाली की दर थोडे खाली येऊ शकतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करायची असल्यास काही दिवस थांबणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
मात्र जर सोने लग्नासाठी, भेटवस्तूसाठी किंवा केवळ परंपरेसाठी घेण्याचा विचार असेल, तर थांबण्यात फारसा उपयोग नाही. कारण पुढे दर कमी झाले तरी तुम्हाला त्या क्षणाचा लाभ मिळणार नाही आणि शुभ मुहूर्तावर खरेदीचा हेतूही फोल ठरेल.
यावर्षी तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की- फक्त दागिन्यांवर पैसा खर्च करण्यापेक्षा काही आधुनिक आणि फायदेशीर पर्यायांचा विचार करावा. जसे की गोल्ड ETF, सॉवरेन गोल्ड बॉण्ड किंवा डिजिटल गोल्ड. या पर्यायांमध्ये दागिन्यांप्रमाणे मेकिंग चार्ज लागत नाही आणि गरज पडल्यास सोने सहज विकता येते. शिवाय हवे असल्यास हळूहळू टप्प्याटप्प्याने खरेदी करता येते, त्यामुळे दर कमी झाल्यास तोट्याचा धोका कमी राहतो.
एकूणच जर परंपरा जपायची असेल तर हलकी खरेदी करा. पण गुंतवणुकीसाठी विचार करत असाल तर थोडा संयम ठेवा. सोने चमकतंय, पण शहाणपणाने खरेदी केल्यासच ती खरेदी खऱ्या अर्थाने सुवर्णमयी ठरेल. या दिवाळीत सोने खरेदी करायची की नाही हा निर्णय फक्त पैशांचा नाही, तर भावनेचा आहे. पण भावना आणि व्यवहार दोन्हींत संतुलन राखणे हेच खरे हुशारीचे ठरले.