मुंबई : ‘रिच डॅड पुअर डॅड’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आणि प्रसिद्ध फायनान्शियल गुरु रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना इशारा दिला आहे. त्यांचे म्हणणे आहे की शेअर बाजार आणि बाँड मार्केट लवकरच मोठ्या धक्क्याला सामोरे जाऊ शकतात. गेल्या एका वर्षात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये तब्बल 50 टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून गुंतवणूकदारांचे लक्ष पुन्हा एकदा या मौल्यवान धातूंवर केंद्रित झाले आहे. कियोसाकींच्या मते, हा काळ सोनं आणि चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देण्याचा आहे.
advertisement
वॉरेन बफेचा बदलता दृष्टिकोन
जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी अनेक वर्षं सोनं-चांदीला ‘बेकार’ आणि ‘नॉन-प्रोडक्टिव्ह अॅसेट’ म्हटले होते. 1998 मध्ये त्यांनी इतकं पर्यंत म्हटलं होतं की- सोने जमिनीतून काढून वितळवलं जातं आणि मग पुन्हा जमिनीत गाडून ठेवलं जातं, त्याचा काही खरा उपयोग नाही. परंतु अलीकडेच बफे यांनी सोनं आणि चांदीला सपोर्ट करणारे विधान केल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. यावर कियोसाकी यांनी कटाक्ष टाकत म्हटले की, जर बफे यांसारखे दिग्गज गुंतवणूकदारही आता या धातूंना सुरक्षित मानत असतील, तर येत्या काळात शेअर आणि बाँड मार्केटवर संकट येणं निश्चित आहे.
सोनं, चांदी आणि क्रिप्टोवर विश्वास
कियोसाकींचा कल नेहमीच गोल्ड, सिल्वर आणि क्रिप्टोकरन्सी (जसे बिटकॉइन आणि इथेरियम) यांच्या बाजूने राहिला आहे. त्यांचे म्हणणे आहे की हे अॅसेट्स महागाई आणि आर्थिक संकटाच्या काळात गुंतवणूकदारांना सुरक्षितता प्रदान करतात. सध्या महागाई, भू-राजकीय तणाव आणि टॅरिफ वॉरमुळे सोन्या-चांदीच्या किमतींना नवी उंची मिळाली आहे. कियोसाकी सतत गुंतवणूकदारांना इशारा देत आहेत की पारंपरिक गुंतवणूक साधनं आता विश्वासार्ह राहिलेली नाहीत.
मोठं संकट की सुवर्णसंधी?
कियोसाकींच्या म्हणण्यानुसार येणारं संकट 1929 मधील ‘ग्रेट डिप्रेशन’इतकं गंभीर असू शकतं. त्यांचे स्पष्ट मत आहे की गुंतवणूकदारांनी आता फक्त शेअर आणि बाँड्सवर अवलंबून न राहता पर्यायी साधनांत गुंतवणूक करायला हवी. बदलत्या परिस्थितीत सोनं, चांदी आणि बिटकॉइन हे केवळ सुरक्षित गुंतवणूक पर्याय ठरणार नाहीत, तर संकटाच्या काळात संपत्ती टिकवून ठेवण्याचं महत्त्वाचं साधन ठरू शकतात.