मुंबई: टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेली टाटा सन्स खाजगी (Private) कंपनीच राहावी की तिला पब्लिक लिस्टिंगद्वारे शेअर बाजारात आणावे, यावर सध्या पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला टाटा ट्रस्टच्या सर्व ट्रस्टींनी सर्वसंमतीने ठराव पारित केला होता की, टाटा सन्स ही खाजगी कंपनी म्हणूनच कायम राहावी. मात्र आता परिस्थितीत बदल दिसून येतो आहे. CNBC-TV18 च्या वृत्तानुसार टाटा समूहातील काही ट्रस्टी आता या निर्णयावर पुनर्विचार करण्याच्या बाजूने आहेत.
advertisement
ट्रस्टींमध्ये मतभेद वाढले
समूहाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार ट्रस्टींमधील अलीकडील मतभेद आणि विजय सिंग यांना ट्रस्टमधून काढून टाकल्यानंतर काही सदस्यांना असे वाटते की, टाटा सन्सचे सार्वजनिक कंपनीमध्ये रूपांतर करणे हे अधिक योग्य आणि पारदर्शक पाऊल ठरेल. मात्र गेल्या शुक्रवारी मुंबईत झालेल्या टाटा ट्रस्टच्या बोर्ड बैठकीत, टाटा सन्सच्या पब्लिक लिस्टिंगवर कोणतीही औपचारिक चर्चा झाल्याचे समोर आले नाही.
SP ग्रुपचा दबाव
शापूरजी पल्लोनजी (SP) ग्रुप ज्यांचा टाटा सन्समध्ये 18.4 टक्के हिस्सा आहे. त्यांनी अलीकडेच टाटा सन्सच्या लिस्टिंगची गरज पुन्हा अधोरेखित केली होती. SP ग्रुपचे प्रमुख मिस्त्री यांनी म्हटले की- टाटा सन्सची सार्वजनिक लिस्टिंग ही नैतिक आणि सामाजिक दायित्वाची बाब आहे. यामुळे पारदर्शकता, सुशासन आणि हितधारकांचा विश्वास वाढेल.
SP ग्रुपने असेही म्हटले की- भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) या संदर्भातील 30 सप्टेंबर 2025 च्या कंप्लायन्स टाइमलाइनचे पालन सुनिश्चित करेल, असा त्यांना पूर्ण विश्वास आहे.
1.2 कोटी गुंतवणूकदारांना फायदा
SP ग्रुपच्या मते, टाटा सन्सची लिस्टिंग झाल्यास 1.2 कोटीहून अधिक गुंतवणूकदारांना थेट फायदा होईल. त्याचबरोबर टाटा ट्रस्टलाही डिव्हिडंड पॉलिसीच्या माध्यमातून अतिरिक्त लाभ मिळू शकतो. SP ग्रुपचे मत आहे की, टाटा सन्स जर पब्लिक कंपनी झाली तर ती जमशेदजी टाटा यांनी रुजवलेल्या पारदर्शकतेच्या तत्त्वाशी अधिक सुसंगत ठरेल.
टाटा समूहासाठी निर्णायक टप्पा
एका बाजूला काही ट्रस्टी टाटा सन्सला खाजगी ठेवणेच सुरक्षित मानतात. कारण त्यामुळे समूहावर ट्रस्टचे नियंत्रण टिकून राहते. तर दुसऱ्या बाजूला SP ग्रुप आणि काही ट्रस्टी पब्लिक लिस्टिंगकडे खुल्या दृष्टिकोनाने पाहतात, कारण त्यातून गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल, व्यवस्थापन अधिक पारदर्शक बनेल आणि समूहाला जागतिक पातळीवर अधिक भक्कम स्थान मिळेल.
सध्या मात्र टाटा ट्रस्टच्या आतला वाद उघड पातळीवर आला नाही. पण या चर्चेमुळे टाटा सन्सच्या भविष्यासंदर्भात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. आगामी काही महिन्यांत RBI च्या निर्देशांनुसार आणि ट्रस्ट बोर्डाच्या भूमिकेनुसार टाटा सन्सच्या लिस्टिंगबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.