प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या दौऱ्यावर गुजरातमध्ये दाखल झाले. अहमदाबाद विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर पीएम मोदी रोड शोसाठी रवाना झाले. रोड शो करताना ते अहमदाबादच्या निकोल भागातील खोडलधाम मैदानात पोहोचले. येथे त्यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी पीएम मोदींनी सुमारे 5400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि शिलान्यास केले. या प्रसंगी पीएम मोदींनी इशाऱ्यातून ट्रम्प टॅरिफवर निशाणा साधला.
advertisement
पंतप्रधान मोदी म्हणाले- आज तुम्ही सर्व जगात स्वार्थी आर्थिक राजकारण कसे चालते आहे, हे पाहत आहात. अहमदाबादच्या या भूमीवरून मी छोट्या उद्योजकांना, दुकानदारांना, शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना सांगू इच्छितो – मोदीसाठी तुमचे हित सर्वात महत्त्वाचे आहे. माझे सरकार कोणत्याही छोट्या उद्योजकाला, शेतकऱ्याला किंवा पशुपालकाला हानी होऊ देणार नाही. कितीही दबाव आला तरी, त्याचा सामना करण्यासाठी आम्ही आपली ताकद वाढवत राहू.
दरम्यान ट्रम्प प्रशासनाने भारतावर 50% टॅरिफ लावले असून रशियन तेलाच्या खरेदी-विक्रीवर अतिरिक्त दंडही लादला आहे. भारताने ट्रम्प यांच्या या निर्णयाला अन्यायकारक,अयोग्य आणि अवास्तव असे संबोधले आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, राष्ट्रीय हिताचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील. मंत्रालयाने सांगितले, या विषयावर आमची भूमिका आधीच स्पष्ट आहे. भारताचे आयात व्यवहार हे बाजारपेठेच्या घटकांवर आधारित आहेत आणि 1.4 अब्ज भारतीयांच्या ऊर्जा सुरक्षिततेच्या दृष्टीने केले जातात. त्यामुळे अमेरिकेने भारतावर अतिरिक्त टॅरिफ लादणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. कारण राष्ट्रीय हितासाठी अशाच प्रकारच्या कृती अनेक इतर देशदेखील करत आहेत.