विजय वंजारा, प्रतिनिधी मुंबई: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आता गणपती आणि दहिहंडी उत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. अनेक ढोल ताशा पथकं गणेश आगमनाची तयारी करत आहेत. तर दहीहंडी पथकं देखील दहिहंडीचा सराव करत आहेत.अशात आता मुंबईच्या दहीसरमधील केतकीपाडा परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. इथं एका ११ वर्षीय गोविंदाचा करुन अंत झाला आहे. दहिहंडीचा सराव करत असताना घडलेल्या अपघातात त्याचा जीव गेला आहे.
advertisement
महेश रमेश जाधव असं मृत पावलेल्या ११ वर्षीय बाल गोविंदाचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून लहान गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेश जाधव हा आपल्या गोविंदा पथकासोबत दहीहंडीच्या सरावात सहभागी झाला होता. याच सरावादरम्यान त्याचा अपघात झाला. यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे लहान वयाच्या मुलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेक ठिकाणी गोविंदा पथके कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था न करता सराव करतात. हेल्मेट, सेफ्टी बेल्ट आणि खाली जाड गादीचा वापर न केल्यामुळे अशा घटना घडण्याची शक्यता वाढते.
तज्ज्ञांच्या मते, दहीहंडीच्या सरावासाठी आणि स्पर्धेसाठी सरकारने कठोर सुरक्षा नियम तयार करून त्यांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. गोविंदांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. या दुर्देवी घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.