वृद्धाश्रमातील वृद्ध महिलेसोबत घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, 90 वर्षांच्या वृद्ध महिलेला क्षुल्लक कारणावरून अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना 6 आणि 7 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. या वृद्धाश्रमात राजू आणि अनिल नावाचे दोन कर्मचारी कामावर आहेत. या दोघांनी सलग दोन दिवस वृद्ध महिलेला मारहाण केल्याचा आरोप आहे.
advertisement
मारहाणीचे कारण काय?
संबंधित वृद्ध महिलेने आश्रमातील वाईट वागणुकीबाबत आपल्या भाचीकडे तक्रार केली होती. ही सांगितलेली गोष्ट त्या कर्मचाऱ्यांना समजली. मग त्यानंतर त्यांनी संतापाच्या भरात तिला काठीने आणि बुक्क्यांनी ही मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता तिला अश्लील शिवीगाळ करत पुन्हा मारण्याची धमकीही दिली. वयाच्या नव्वदीत असलेली ही महिला मारहाणीमुळे गंभीर जखमी झाली. तिची अवस्था पाहता तातडीने तिला कांदिवली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच महिलेच्या भाचीने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची योग्य ती दखल घेताच संबंधित दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाचे आदेश सहाय्यक पोलीस निरीक्षक गौरव इंगोले यांना दिले आहेत.
