ठाणे : बदलापुरात शाळेत चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी एन्काउंटर करण्यात आला. ट्रांझिट रिमांडवर त्याला ठाण्याला आणलं जात असताना मुंब्रा बायपासजवळ अक्षय शिंदे यानं पोलिसांची रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबाराचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ गोळ्या झाडण्यात आल्या. यातील एक गोळी अक्षयच्या डोक्याला लागली आणि यातच अक्षयचा मृत्यू झाला. आता एन्काउंटर ज्या गाडीत झाला त्या गाडीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
advertisement
अक्षयचा एन्काउंटर ज्या गाडीत झाल्या त्याचा पंचनामा करण्यात आला. गाडीत बंदुकीच्या ४ रिकाम्या पुंगळ्या आढळल्या आहेत. त्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. अक्षयने ३ गोळ्या झाडल्या तर एक गोळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी झाडली होती. गाडीत दोन वेगवेगळे रक्ताचे नमुने सापडले आहेत. यात एक रक्ताचा नमुना अक्षय शिंदेचा तर दुसरा रक्ताचा नमुना सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचा असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.
पोलीस व्हॅनमध्ये काय घडलं?
अक्षय शिंदेला पोलीस व्हॅनमधून तळोजा कारागृहातून ठाण्याला आणलं जात होतं. त्याच्या दुसऱ्या पत्नीने केलेल्या आरोप प्रकरणी चौकशीसाठी पोलीस त्याला नेत होते. तेव्हा पोलीस व्हॅनमध्ये अक्षय शिंदेने सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे यांची रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला. यात नीलेश मोरे जखमी झाले. व्हॅनमध्ये सोबत असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळी झाडली. अक्षयच्या डोक्यात गोळी लागून त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जेजे रुग्णालयात केले जात आहे.
एन्काऊंटरआधी अक्षयचे शेवटचे शब्द काय होते, सांगताना आई ढसाढसा रडली
कोण आहेत अक्षय शिंदेची गेम करणारे पोलीस अधिकारी?
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी याआधी माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असणाऱ्या प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केलं होतं. संजय शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. एका खून प्रकरणातील आरोपी विजय पालांडे हा पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला होता. तेव्हा संजय शिंदे यांना निलंबित केलं होतं. पण २०१४ मध्ये मुंबई पोलिसात संजय शिंदे यांना पुन्हा कामावर घेण्यात आलं होतं.
