'या' ठिकाणाहून होणार सुरुवात
मेट्रो-9 ही ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो मार्गिका आहे. दहिसर पूर्व येथून सुरू होणारी ही मार्गिका मिरा-भाईंदर परिसरातील काशिगावपर्यंत जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मिरागाव आणि काशिगाव अशी चार स्थानके प्रवाशांसाठी उपलब्ध असतील. पुढील टप्प्यात साईबाबा नगर, मेदिता नगर, शहीद भगतसिंग गार्डन आणि सुभाषचंद्र बोस स्टेडियम या स्थानकांचा समावेश करण्यात येणार आहे. एकूण 11.38 किमी लांबीच्या या प्रकल्पाचा प्रारंभिक टप्पा सध्या अंतिम चाचणी टप्प्यात आहे.
advertisement
आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडले जाणार?
दहिसर येथे मेट्रो-9 मार्गिका मेट्रो-7 मार्गिकेशी जोडली जाणार आहे. या ठिकाणी प्रवासी सहजतेने मेट्रो-7 अ आणि मेट्रो-2 अ मार्गिकांवर गाडी बदलू शकतील. त्यामुळे अंधेरी पूर्वेतील गुंदवली स्थानकावरून निघालेली मेट्रो थेट मिरा-भाईंदरपर्यंत धावू शकेल. मेट्रो-7 अ मार्गिका आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडली जाणार असल्याने प्रवाशांना विमानतळावरून थेट मिरा-भाईंदरपर्यंत अखंडित प्रवासाची सुविधा मिळेल.
या प्रकल्पामुळे मेट्रो मार्गाने मुंबईतील विविध भागांमध्ये दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. मेट्रो-9 आणि मेट्रो-2 अ यांच्या माध्यमातून लिंक रोडशी जोडणी मिळणार आहे. तसेच भविष्यात मिरागाव येथे प्रस्तावित मेट्रो-10 मार्गिका सुरू झाल्यास ठाण्यातील गायमुखपर्यंत मेट्रोने प्रवास करणे शक्य होईल. नेताजी सुभाषचंद्र बोस स्थानक येथून मेट्रो-13 मार्गिकेच्या माध्यमातून वसई-विरार परिसरालाही मेट्रो सेवा उपलब्ध होईल.
किती वेळात अंतर कापले जाणार
मेट्रो-9 सुरू झाल्यानंतर ठाणे आणि मुंबईदरम्यान प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. सध्या अंधेरी ते मिरा-भाईंदर प्रवासाला वाहतूक कोंडीमुळे साधारणत दीड ते दोन तास लागतात. मात्र, मेट्रो सुरू झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या 30 ते 35 मिनिटांत पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
या मेट्रो मार्गिकेमुळे प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. तसेच मिरा-भाईंदर परिसराच्या विकासालाही चालना मिळणार असून स्थानिक नागरिकांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार आहे.