या प्रकल्पाअंतर्गत उरण तालुक्यातील गव्हाण गावाजवळील शिवाजीनगर इंटरचेंज येथे सहा रॅम्प उभारण्यात येणार आहेत. अटल सेतूची आखणी होत असताना कोस्टल रोडचे काम सुरू नसल्याने ही जोडणी शक्य नव्हती. मात्र, सिडकोने आता कोस्टल रोडच्या कामाला गती दिल्यामुळे शिवाजीनगर कनेक्टरद्वारे आवश्यक लिंकेज पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या सहा रॅम्पच्या उभारणीसाठी तटीय नियमन क्षेत्र (सीआरझेड) प्राधिकरणाने अटी-शर्तींसह मंजुरी दिली असून प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
advertisement
सातारा ते पुणे आता सुसाट! खंबाटकीचा अवघड घाट टाळता येणार, वेळ वाचणार, कसा आहे नवा मार्ग?
या प्रकल्पामुळे केवळ रस्ते वाहतूकच नव्हे तर रेल्वे कनेक्टिव्हिटी देखील मजबूत होणार आहे. न्हावा रोड आणि उरण रोडद्वारे हे क्षेत्र आधीच जोडलेले असून या नव्या रॅम्पमुळे खारकोपर रेल्वेस्थानकाची कनेक्टिव्हिटी अधिक प्रभावी होणार आहे. परिणामी, जेएनपीटी, चिर्ले, मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ यांमधील दळणवळणात मोठी सुधारणा होईल.
दरम्यान, या प्रकल्पात सुमारे 936 खारफुटी झाडे बाधित होणार असली तरी पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन (EIA) अहवालानुसार नुकसान कमी करण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाणार आहेत. सुमारे 3.5 हेक्टर क्षेत्रावर हा प्रकल्प राबवला जाणार असून त्यात 32 स्ट्रक्चरल मॉड्यूल्सचा समावेश आहे. प्रत्येकी 75 मीटर लांबीचे हे स्पॅन 1.0 मीटर व्यासाच्या बोर कास्ट-इन-सिटू पाईल्सवर उभारले जाणार असून दीर्घकालीन मजबुतीसाठी खडकात पुरेसे सॉकेटिंग करण्यात येणार आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील नागरिकांसाठी मुंबई व नवी मुंबईकडे जाणे अधिक सोपे, जलद आणि सुरक्षित होणार असून संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशाच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे.






