मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जोगेश्वरी पूर्व भागात इमारतीचं बांधकाम सुरू असताना सिमेंटचा ब्लॉक डोक्यात पडून एका २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील जोगेश्वरी पूर्व भागात ही बुधवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. संस्कृती अनिल अमीन (वय २२) असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहेय जोगेश्वरी पूर्वेत मजासवाडी परिसरात एका टोलेजंग इमारतीचं बांधकाम सुरू आहे. इमारतीच्या परिसरातून जाण्यासाठी एक छोटीशी गल्ली होती. इथून स्थानिक नेहमी ये जा करत होते. आज बुधवारी सकाळी नेहमी प्रमाणे संस्कृती इथून जात होती. पण अचानक एक सिमेंटचा ब्लॉक खाली कोसळला. हा ब्लॉक तिथून जाणाऱ्या २२ वर्षीय संस्कृतीच्या डोक्यावर पडला. डोक्यात सिमेंटचा ब्लॉक पडल्यामुळे संस्कृतीला जबर मार लागला ती जागेवरच बेशुद्ध पडली. अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
advertisement
स्थानिकांनी धाव घेऊन या तरुणीला बाजूला केलं. तसंच या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच मेघवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल केलं पण डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं. या तरुणीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठण्यात आला आहे.
मुळात इमारतीचं बांधकाम सुरू असताना इमारतीभोवती सुरक्षा जाळी लावण्याचा नियम आहे. पण, असं असतानाही सिमेंटचा ब्लॉक खाली कोसळला कसा, यामध्ये कुणाची चूक होती, असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थितीत केला आहे. या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहे.