चुकीचा संदेश आणि प्रत्यक्ष वेळेत धावलेली गाडी
उद्यान एक्स्प्रेस बुधवारी सकाळी 8.10 वाजता सीएसएमटी येथून नियमित वेळापत्रकानुसार सुटली. ही गाडी कल्याण रेल्वे स्थानकात सकाळी 9.05 वाजता पोहोचून पुढील प्रवासासाठी रवाना झाली. मात्र याआधीच मध्य रेल्वेच्या संबंधित विभागातून ही गाडी उशिराने सुटणार असल्याचा संदेश प्रवाशांच्या मोबाइलवर पाठवण्यात आला. त्यामुळे अनेक प्रवासी उशिरा स्थानकात पोहोचले आणि त्यांना गाडी निघून गेल्याचे समजले.
advertisement
अखेर प्रतिक्षा संपली! नवी मुंबईतून पहिलं टेकऑफ, ‘या’ 5 शहरांसाठी विमानसेवा सुरू
कल्याण स्थानकात गोंधळ, प्रवाशांचा मनस्ताप
कल्याण रेल्वे स्थानकात पोहोचलेल्या प्रवाशांना उद्यान एक्स्प्रेस न मिळाल्याने मोठा गोंधळ उडाला. काही प्रवाशांना ही गाडी कल्याण येथे थांबा न घेता निघून गेल्याचा संशयही आला. नाताळ आणि नववर्ष साजरे करण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना अचानक प्रवासात अडथळा आल्याने मानसिक त्रास सहन करावा लागला.
पर्यायी व्यवस्था आणि गाडी थांबवण्याचा निर्णय
घटनेची दखल घेत मध्य रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुमारे 40 प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था केली. या प्रवाशांना कल्याण येथून कोयना एक्स्प्रेसने कर्जतपर्यंत नेण्यात आले. त्याच वेळी उद्यान एक्स्प्रेस भिवपुरी येथे थांबवण्यात आली. कोयना एक्स्प्रेसने प्रवासी कर्जत येथे पोहोचल्यानंतर उद्यान एक्स्प्रेस कर्जत येथे आली आणि त्या प्रवाशांना घेऊन पुढील प्रवासासाठी रवाना झाली.
24 जानेवारीचा बदल, 24 डिसेंबरला पाठवलेला संदेश
उद्यान एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात 24 जानेवारी रोजी बदल करण्याचे नियोजन आहे. मात्र मध्य रेल्वेच्या संबंधित विभागाकडून हा संदेश चुकून 24 डिसेंबर रोजीच प्रवाशांना पाठवण्यात आला. कर्मचाऱ्याच्या या चुकीमुळेच संपूर्ण गोंधळ निर्माण झाला. नंतर मध्य रेल्वेने सुधारित संदेश पाठवला होता; मात्र अनेक प्रवाशांनी तो न पाहिल्याने त्यांची धावपळ झाली, अशी माहिती रेल्वे सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल निला यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही.






