मुंबईकरांसाठी मोठी बातमी
एल्फिन्स्टन पुलाचा काही भाग पश्चिम रेल्वे मार्गावर येत असल्याने पश्चिमेकडील लोखंडी भाग हटवण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या ब्लॉकचीही गरज भासणार आहे. यासाठी पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. हा जुना पूल पूर्णपणे पाडून त्या ठिकाणी वरळी-शिवडी उन्नत मार्ग उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जाणार आहे.
रोजच्या लोकल प्रवासाला बसणार मोठा फटका?
advertisement
या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे, महारेल तसेच इतर प्रशासकीय यंत्रणांमध्ये अनेक बैठका पार पडल्या. त्यानंतर सुरुवातीला दोन तासांचे 19 रात्रकालीन ब्लॉक घेऊन प्रत्यक्ष पाडकाम सुरू करण्यावर सर्वांचे एकमत झाले आहे. याशिवाय अधिक कालावधीचा स्वतंत्र मेगाब्लॉक घेण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सध्या मिळालेल्या ब्लॉकनुसार येत्या आठवड्यात सोमवारी किंवा मंगळवारी पुलाचा लोखंडी सांगाडा हटवण्याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे अशी माहिती महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जैसवाल यांनी दिली आहे.
दरम्यान मध्य रेल्वे मार्गावर रात्री मोठ्या प्रमाणात लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक सुरू असते. त्यामुळे या 19 रात्रकालीन ब्लॉकचा परिणाम लोकलसह इतर गाड्यांवर होण्याची शक्यता आहे. प्रवाशांची गैरसोय कमी व्हावी यासाठी ब्लॉकचे नियोजन काळजीपूर्वक करण्यात येईल आणि अंतिम वेळापत्रक वेळेवर जाहीर केले जाईल असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
