अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफडीएने मुंबईतील मॅकडोनाल्डसह 30 फास्टफूड दुकानांना नोटीस पाठवली आहे. अहमदनगर इथं मॅकडोनाल्डमधील बर्गर आणि नगेट्समध्ये चीझऐवजी ‘चीज ॲनालॉग्स’चा वापर करण्यात येत असल्याच उघडकीस आलं. त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यातील मॅकडोनाल्ड्सह अन्य फास्टफूड विक्रेत्या कंपन्यांच्या शाखांची तपासणी सुरू केली. त्यानुसार मुंबईतील 30 आस्थापनांची तपासणी करून त्यांना सुधारणा करण्यासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनानं नोटीस पाठवली आहे.
advertisement
Kitchen Jugaad Video : पनीर वापरताना त्यात टुथपेस्ट टाका; विचित्र आहे पण याचा मोठा फायदा
मॅकडोनाल्ड्स या आंतरराष्ट्रीय रेस्टॅारंट चेनच्या अहमदनगर येथील रेस्टॅारंटवर एफडीएनं कारवाई केली आहे. एफडीएने अहमदनगरमधील शहरातील केडगाव भागातील मॅकडोनाल्ड्सच्या रेस्टॅारंटचा परवाना रद्द केला आहे. मॅकडोनाल्ड्सकडून विकल्या जाणाऱ्या बर्गर, नगेट्स अशा खाद्यपदार्थांमध्ये दर्जेदार चीजला पर्याय म्हणून दुय्यम दर्जाचे पदार्थ वापरले जात असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर मेनूकार्डमधून ‘चीज’ हा शब्दच हटवण्यात यावा, असंही सूचित करण्यात आलं असून, हा बदल राज्य आणि देशव्यापी असावा असा आग्रह एफडीएने धरला आहे.
चीझऐवजी चीझ अॅनालॉग
चीजला पर्याय म्हणून वापरले जाणारे ‘चीज अॅनालॅाग’ हे चीजसारखेच दिसतात. त्यांची चव, स्पर्श आणि गुणवैशिष्ट्यंही चीजसारखीच असतात. या पदार्थांचा मूळ स्रोत दूध नसून, स्वस्त वनस्पती तेल हा असतो म्हणजे स्वस्त दर्जाच्या वनस्पती तेलापासून हे चीज अॅनालॉग तयार केले जातात. मॅकडोनाल्ड्सच्या मेनूमध्ये किंवा रेस्टॉरंटमधील डिस्प्ले बोर्डवर या वस्तुस्थितीचा उल्लेख नसल्यामुळे ते ग्राहकांची दिशाभूल करतात. त्यामुळे ग्राहकही आपण खरं दर्जेदार चीज खातो आहोत, असं समजतात असं अन्न आणि औषध प्रशासन विभागाने म्हटलं आहे.
फास्ट फूड आणि जंक फुडमध्ये काय आहे फरक? 99 टक्के लोकांचा आहे चुकीचा समज
एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी ‘टाईम्स ॲाफ इंडिया’ ला दिलेल्या माहितीनुसार असे पर्याय वापरले असता ग्राहकांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होणं शक्य आहे आणि ही सरळसरळ ग्राहकांची फसवूणक आहे. काळे म्हणाले, ‘तपासणीदरम्यान आमच्या अधिकाऱ्यांना चीजला पर्याय वापरले जात असल्याचा उल्लेख रेस्टॉरंटने केलेलं कुठेही आढळलं नाही. चीज बर्गर, चीज नगेट्स, चीजी डिप या नावांमधून या पदार्थांमध्ये चीज नव्हे तर चीजसदृश पदार्थ वापरले जात असल्याचं स्पष्ट होत नाही. इतर अनेक फास्ट फूड रेस्टॅारंट्सही अशा भेसळयुक्त पदार्थांचा वापर करत असण्याची शक्यता आहे. आम्ही लवकरच त्यांचीही चौकशी करणार आहोत.’.
मॅकडोनाल्डस काय म्हणालं?
ऑक्टोबर 2023 मध्ये अहमदनगरमधील केडगाव येथील मॅकडोनाल्ड्सच्या रेस्टॅारंटमधील पदार्थांची तपासणी करून या कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. तब्बल आठ पदार्थांमध्ये चीजसदृश घटक वापरल्याचं सिद्ध झाल्यावर एफडीएने त्यांना कारणं दाखवा नोटीस बजावली होती. त्यांच्याकडून देण्यात आलेलं स्पष्टीकरण पुरेसं विश्वासार्ह न वाटल्यामुळे त्यांचा परवाना रद्द करण्यात आला. डिसेंबरमध्ये मॅकडोनाल्ड्सने एफडीएला पत्र दिलं असून, मेनूमधील ‘चीज’ हा शब्द वगळण्यात आल्याचा दावा केला होता. मात्र टाईम्स ॲाफ इंडियाने गुरुवारी या बाबत मॅकडॅानल्ड्सशी संपर्क साधला असता त्यांच्या प्रवक्त्याने चीजसदृश्य पदार्थ वापरत असल्याचं नाकारलं आणि आम्हाला ग्राहकांना पुन्हा एकदा खात्री पटवून द्यायची आहे की आम्ही आमच्या सगळ्या पदार्थांत केवळ उत्तम दर्जाचं चीजच वापरतो, असं सांगितलं.
