आशुतोष पूर्णचंद्र मोहंती असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणाचं नाव आहे. तो देखील एक चांगला डान्सर आहे. त्याला आरे पोलिसांनी अटक केली आहे. नोकरी देण्याच्या आमिषाने आरोपीनं पीडित तरुणीला गोरेगाव येथील एका व्हिलामध्ये आणून त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही डान्सर म्हणून काम करते. आरोपी आशुतोष हा तिचा मित्र असून तोदेखील एक चांगला डान्सर आहे. मार्च महिन्यांत त्याने तिला नोकरीच्या आमिषाने गोरेगाव येथील एका पॉश व्हिलामध्ये आणलं होतं. याठिकाणी आशुतोषने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला, तिने विरोध करुनही त्याने तिच्यावर अत्याचार केला होता.
advertisement
आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने हा प्रकार कोणालाही सांगू नकोस. सांगितल्यास जीवे मारेन, अशी धमकी देखील दिली होती. बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. मात्र गेल्या आठवड्यात तिने आरे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आशुतोषविरुद्ध तक्रार केली. हा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आशुतोषला अटक केली आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.