थर्टी फर्स्टच्या रात्री डेटिंग अॅपवर ओळख वाढवून एका 40 वर्षीय व्यक्तीला धमकावून 20 हजार रुपयांची लूट करण्यात आली. या प्रकरणी ‘ऋषिकेश’ असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीसह चार जणांविरोधात पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार हे साकीविहार रोडवरील एका खासगी कंपनीत मशिन ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. 31 डिसेंबर 2025 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांनी एका डेटिंग अॅपवर चॅटिंग सुरू केले. दरम्यान, एका अनोळखी व्यक्तीशी त्यांचा व्हिडीओ कॉलवर संवाद झाला. विश्वास संपादन केल्यानंतर संबंधित व्यक्तीने तक्रारदाराला चांदिवली बसस्टॉपजवळ भेटण्यास सांगितले.
advertisement
मशिनमध्ये अडकलं ATM कार्ड; 'बँकेचा कर्मचारी' आला अन् केलं मोठं कांड, पुण्यातील घटना
रात्री साडेनऊच्या सुमारास ‘ऋषिकेश’ नाव सांगणारा व्यक्ती दुचाकीवर तिथे आला. त्यानंतर त्याने तक्रारदाराला विहार लेक रोडवरील हॉटेल एक्सप्रेस इनच्या मागील मोकळ्या जागेत नेले. या ठिकाणी आधीच दबा धरून बसलेल्या तीन तरुणांनी तक्रारदाराला शिवीगाळ करत धमकावले आणि जबरदस्तीने 20 हजार रुपये काढून घेतले. घटनेनंतर तक्रारदाराने पवई पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, सोशल मीडिया आणि डेटिंग अॅप्स वापरताना नागरिकांनी अधिक सावध राहावे, अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये, तसेच प्रत्यक्ष भेटी टाळाव्यात, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. वाढत्या डिजिटल गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाचा विवेकपूर्ण वापर करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.






