मुंबई : एक मध्यमवर्गीय घरातील व्यक्ती, जेजे स्कूल ऑफ आर्ट्सचा विद्यार्थी हा अभिनय क्षेत्रात कोणतीही ओळख नसताना फक्त आपल्या अभिनयाच्या जोरावर, आपल्या कला, कौशल्याच्या जोरावर अभिनय क्षेत्रांत चांगला ठसा उमटवतो, प्रवास निश्चितच इतरांसाठीही प्रेरणादायी ठरतो. ही कहाणी आहे कलाकार मकरंद पांधे यांची. लोकल18 च्या टीमने त्यांच्याशी संवाद साधत, त्यांचा संपूर्ण प्रवास जाणून घेतला.
advertisement
अभिनेता मकरंद पाध्ये यांनी लोकल18 बोलताना सांगितले की, लहानपणी शाळेत पहिल्यांदा म्हणजे त्यावेळी माँटेसरीमध्ये असताना स्टेजवर जादूचे प्रयोग, डान्स आणि बालनाट्य पाहिल्यावर मलादेखील तिथे जाऊन काहीतरी करावेसे वाटले. मग पहिलीत गेल्यावर आमच्या बाईंनी मला एका नाटकात भाग घ्यायला सांगितले आणि मला बालशिवाजीची भूमिका दिली. तेव्हापासूनच माझा अभिनयाचा प्रवास सुरू झाला.
खरंतर अगदी लहान असताना मी माझ्या आई वडिलांच्या पुण्याईमुळेण अनेक दिग्गज कलाकारांच्या घरी जात असे. उदा. काशिनाथ घाणेकर, सुलोचना दीदी, सचिन पिळगांवकर, वगैर. पूर्वी दादरला प्लाझासमोर तृप्ती हॉटेलच्या शेजारी वसंत फोटो स्टुडिओ होता. त्याचे मालक वसंत चिटणीस, आम्ही त्यांना भाई म्हणायचो. ते माझ्या वडिलांचे मित्र.
माझ्या वडिलांना फोटोग्राफीची आवड होती. ते नेचर, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायचे. त्या वसंत फोटो स्टुडिओत शिवाजी मंदिरची तिकीट विक्री व्हायची आणि संध्याकाळी आठ साडे आठनंतर अनेक कलाकार मंडळी तिथे येऊन बसायची. अरुण सरनाईक, मधुकर तोरडमल, काशिनाथ घाणेकर, चंद्रकांत-सूर्यकांत मांढरे, विश्वास सरपोतदार, राजदत्त, विश्वनाथ बागुल, दत्ता भट अशी सगळी मंडळी जमायची आणि माझे वडीलही कधी कधी तिथे थांबायचे.
जपानी पद्धतीचे अन् सर्वांना आपलेसे करणारं चिंचोली उद्यान, गजबजलेल्या मुंबईतील एक शांत ठिकाण, VIDEO
त्यामुळे या सगळ्या कलावंतांना मी अगदी जवळून पाहिले होते. एकदा प्रीतिसंगम नाटकाचा प्रयोग शिवाजी मंदिरला होता आणि त्यात "कृष्ण माझी माता" हे गाणे सुरू झाले. अर्थात ते भक्तीगीत होतं आणि त्यामध्ये सगळे वारकरी दिंडी घेऊन जातात, असे दृष्य होते. तर ते सुरु झाले आणि मी खाली प्रेक्षकांत त्या वारकऱ्यांसारखा नाचायला लागलो आणि वरून ते विश्वनाथ बागुल यांनी पाहिलं आणि मला घेऊन स्टेजवर गेले आणि त्यांच्या बरोबर नाचायला सांगितलं आणि मी त्या दिंडीत सामील झालो, अशाप्रकारे ते माझे स्टेजवरचे पहिले पाऊल होते.
पुढे शाळेतून अनेक बालनाट्य स्पर्धेत भाग घेतला. मग कॉलेजमधून एकांकिका स्पर्धा, पुढे राज्य नाट्यस्पर्धा, अंतर राज्य स्पर्धा अशा स्पर्धांमधून भाग घेत अभिनय, सेटिंग, लायटिंग, म्युझिक ऑपरेटिंग, वेशभूषा, रंगभूषा या सगळ्या गोष्टी शिकत होतो. पुढे बारावीनंतर मी वडिलांच्या सांगण्यावरून मेकॅनिकल आणि सिव्हिल ड्राफ्ट्समनशिप केली. एका आर्किटेक्टकडे इंटर्नशिपही केली. पण त्यात मन रमत नव्हतं. मग माझा मोठा भाऊ म्हणाला, चल आपण कमर्शिअल आर्ट्सला जाऊया. म्हणून आम्ही दोघांनी पुन्हा कॉलेज जॉईन केले. भावाने रहेजा स्कूल ऑफ आर्ट आणि मी जेजे स्कूल ऑफ आर्टला ॲडमिशन घेतली आणि आमच्या दोघांचे जाहिरात क्षेत्रात पदार्पण झाले.
मलेशियात घुमला हरिनामाचा गजर, संत नामदेव महाराज समाधी महोत्सवाची क्वालालंपूर येथे सांगता, VIDEO
पुढे आमची स्वतःची जाहिरात एजन्सी सुरू केली. पण पुढे काही वर्षांनी माझ्या मोठ्या भावाचे निधन झाले आणि मला दुसऱ्या जाहिरात एजन्सीमधून नोकऱ्या कराव्या लागल्या. पण त्या करता करता मी नाटकांमधून, मालिकांमधून अभिनय करतच होतो. त्याचबरोबरमी तबला शिकत होतो. त्यामुळे गाण्याचा कान आहे. अनेक संगीत नाटकांतून मी गद्य नट म्हणून काम केले आहे. पण मोरूची मावशी, संगीत प्रीती संगम आणि आत्ता सुरू असलेले संगीत मंदारमाला या नाटकात मला गाणी होती आणि आहेत.
मालिका आणि चित्रपट करतानाही मला खूप फायदा झाला. खूप काही शिकायला मिळाले. कॅमेरा, लाईटस्, साऊंड ऑपरेटिंग, सहाय्यक म्हणूनही मी अनेक ठिकाणी काम केले आहे. जे जे मध्ये असताना मी दोन वर्ष दूरदर्शनला मोहन विघ्ने यांच्या हाताखाली कॅमेरामन म्हणून काम करत होतो. त्यानंतर कै. प्रकाश शिंदे यांच्या हाताखाली देखील कॅमेरामन असिस्टंट म्हणून काम केले. त्यांनीही खूप शिकवलं.
आशुतोष दातार यांच्या जाहिरात एजन्सीमधून असिस्टंट असताना दिग्दर्शन आणि एडिटिंग शिकलो. पुढे अनिश त्रिवेदी याच्या जाहिरात एजन्सी मधून 5 वर्षे साऊंड इंजिनिअर म्हणून काम केले. आजही त्याचा खूप फायदा होतो. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या निमित्ताने मला प्रसिद्धी मिळाली, असे म्हणत त्यांनी आपला उलगडला. तसेच यावेळी त्यांनी मंगेश देसाई, प्रवीण तरडे आणि शंतनु भाके आणि संपूर्ण टीमचे आभारही मानले.