हुसेन शेख असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर योगेश धीवर आणि समीर धीवर असं आरोपी पिता-पुत्रांची नावं आहेत. हत्येची घटना घडल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
मुंबईच्या वरळी परिसरात धीवर कुटुंब आणि मयत हुसेन शेख हे एकमेकांच्या घराशेजारी राहतात. दोन दिवसांपूर्वी हुसेन याने योगेश धीवर यांच्या मुलीला मारहाण केली होती. ही गोष्ट योगेशला समजल्यानंतर तो चांगलाच संतापला. शुक्रवारी हुसेन शेख हा एलआयसी कार्यालयाजवळ उभा होता. त्याचवेळी योगेश धीवर आणि त्यांचा मुलगा समीर धीवर हे दोघे तिथे आले. मुलीला मारहाण का केली, याबद्दल त्यांनी हुसेनला जाब विचारला. यावरून तिघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला.
advertisement
मारहाणीत हुसेन गंभीर जखमी
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात बाप-लेकांनी मिळून हुसेन शेखला बेदम मारहाण केली. या मारहाणीत हुसेन गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वरळी पोलिसांनी योगेश धीवर आणि समीर धीवर या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.