मुंबई : राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वीच पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. तर, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनादेखील गणेशोत्सवाच्या आधी पगार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तर, दुसरीकडे महापालिका कर्मचाऱ्यांनादेखील गणेशोत्सवाआधीच वेतनाचे वेध लागले आहेत. वेतनाच्या मुद्यावर मुंबई महापालिकेतील कर्मचारी संघटनाही सक्रिय झाल्या आहेत. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे, मुंबई महानगरपालिकेतील सर्व कर्मचारी, अधिकारी, कंत्राटी कामगार व इतरांना देखील गणेशोत्सवापूर्वी पगार देण्याची मागणी केली आहे.
advertisement
गणेशोत्सव साजरा करताना सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि निवृत्तीवेतनधारकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेत ५ दिवस आधीच पगार करण्याचा निर्णय घेतला.
कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी सांगितले की, “राज्य सरकारने 26 ऑगस्ट रोजी आपल्या अखत्यारीतील कर्मचाऱ्यांना पगार देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. वित्त विभागाने याबाबत शासन निर्णय काढला असून, यामुळे कर्मचाऱ्यांना बाप्पाच्या आगमनाचा उत्सव आनंदाने साजरा करता येणार आहे. त्याच धर्तीवर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही ही सुविधा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
गणेशोत्सव हा मुंबईकरांसाठी सर्वात मोठा उत्सव मानला जातो. शहरातील लाखो कुटुंबं या उत्सवात उत्साहाने सहभागी होतात. मात्र, महागाईच्या पार्श्वभूमीवर अनेकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वेळेत पगार मिळाल्यास कुटुंबांवरील ताण कमी होऊन उत्सवाचा आनंद द्विगुणित होईल, असे कामगार सेनेचे म्हणणे आहे.
मुंबई महानगरपालिकेतील कायमस्वरूपी कर्मचारी, अधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यरत कंत्राटी कामगार हे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळतात. गणेशोत्सवासारख्या पारंपरिक आणि कौटुंबिक उत्सवाच्या काळात या सर्व घटकांना वेळेत वेतन मिळणे आवश्यक असल्याचे कर्मचारी संघटनांचे मत आहे.
आता आयुक्त गगराणी या मागणीवर काय निर्णय घेतात, याकडे महापालिका कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. जर सकारात्मक निर्णय झाला, तर राज्य सरकारप्रमाणेच मुंबई महानगरपालिकेतील हजारो कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठीही हा उत्सव अधिक आनंददायी ठरेल.