जैनमुनींचे वादग्रस्त विधान
जैनमुनी कैवल्यरत्न यांनी धर्मसभेत बोलताना थेट डॉक्टरांवरच टीका केली. ते म्हणाले, "मी डॉक्टरांना मूर्ख मानतो. एक-दोन व्यक्ती मेल्याने काय होतं? पण दररोज सामान्य माणूस मरतोय, त्याचे काय? त्याचा कोणी विचार करत नाही. हे सगळं राजकारण आहे, याचा निर्णय येत नाही तोपर्यंत आपण लढत राहायचं."
इतकेच नाही, तर जैन मुनींनी राजकीय टिप्पणी करताना, देवेंद्र फडणवीस हे आपल्यामुळेच मुख्यमंत्री पदावर बसले आहेत, असंही विधान केलं. मंत्री मंगलप्रभात लोढा धर्मसभेला गैरहजर राहण्याबद्दल बोलताना, "लोढा नाही आले हे सरकारची मिलीभगत आहे" असा थेट आरोपही त्यांनी केला. त्यांच्या या 'अकलेच्या ताऱ्यांमुळे' (वादग्रस्त विधानांमुळे) आता नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
advertisement
कबुतरांसाठी जैन समुदायाचा 'धर्माचा लढा' सुरूच
मुंबई महानगरपालिकेने कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार होत असल्याचे कारण देत कबुतरखाने बंद करण्याची मोहीम सुरू केली आहे. या कारवाईला जैन समुदायाचा तीव्र विरोध आहे. या बंदमुळे मृत्यू झालेल्या हजारो कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून जैन समुदायाने आज दादर येथील योगी सभागृहात धर्मसभेचे आयोजन केले होते.
मृत कबुतरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करणे आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी सभा सुरू आहे. जैन धर्मात कबुतरांना हिंदू धर्मातील गाईंप्रमाणेच मान आहे. त्यामुळे कबुतरांवर अन्याय का, असा प्रश्न उपस्थित करत कबुतरखाने पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
माजी नगरसेवक पुरण दोशी यांनी माहिती दिली की, सरकारने पर्युषण काळातही हा प्रश्न मार्गी लावला नाही. त्यामुळे या धर्मसभेत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल. जर प्रश्न सुटला नाही, तर दिवाळीनंतर आझाद मैदानात मोठे आंदोलन पुकारण्यात येईल. सकल जैन समाज, महावीर मिशन ट्रस्ट, शेरी ॲन्ड दिया फाउंडेशन यासह अनेक संस्था या सभेत सहभागी झाल्या होत्या.