राजेश गोस्वामी असं आत्महत्या करणाऱ्या ५२ वर्षीय पुजाऱ्याचं नाव आहे. आपल्या नावाच्या बदनामी होईल आणि अटकेच्या भीतीपोटी शनिवारी सकाळी मंदिरातील पंख्याला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश गोस्वामी हे गेल्या अनेक वर्षांपासून तारकेश्वर महादेव मंदिरात पुजारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावर एका तरुणीने आक्षेपार्ह संदेश पाठवल्याची तक्रार कांदिवली पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला होता. मात्र, पोलीस कारवाईच्या आधीच राजेश यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
advertisement
राजेश गोस्वामी यांनी शनिवारी सकाळी मंदिरात कोणीही नसताना पंख्याला गळफास घेतला. ही घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
राजेश गोस्वामी हे विवाहित असून त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. त्यांचा एक मुलगाही पुजारी असून त्यांच्यावर कुटुंबाची मोठी जबाबदारी होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बदनामी आणि अटकेच्या भीतीपोटी त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे मंदिरातील भाविकांमध्येही चर्चेला उधाण आले आहे.