कोकण रेल्वेच्या 35व्या वर्धापनदिनानिमित्त वाशी येथे बुधवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी प्रवाशांना सुविधा देण्याच्या नवीन उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास मिळावा यासाठी कार रो-रो सेवेचा विस्तार करण्यात येत आहे.
advertisement
कोणत्या स्थानकांवर सुविधा
मुंबई-कोकण मार्गावर कार रो-रो सेवा सुरु करण्यासाठी सावंतवाडी रोड, रत्नागिरी आणि संगमेश्वर या स्थानकांवर रॅम्पसह आवश्यक पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. यामुळे प्रवाशांचे गाडीसह प्रवास करणे सोपे होईल. रेल्वे प्रशासनाने सांगितले की, या तीन ठिकाणी सुविधा उभारण्यासोबतच इतर पायाभूत सुविधांचा विस्तारही होईल.
पूर्वीचा अनुभव
गणेशोत्सवानंतर आणि दिवाळीच्या काळात प्रवाशांकडून कार रो-रो सेवेबाबत सातत्याने सूचना येत आहेत. यामुळे कोकण रेल्वेने प्रथमच खासगी गाडीसह प्रवासी वाहतूक करण्यासाठी रो-रो सेवा सुरु केली होती. पहिल्या कार रो-रो प्रवासात सात खासगी कारचा प्रवास यशस्वी झाला होता, आणि प्रवाशांनी त्याचे स्वागत केले.
दुहेरीकरणाची गरज
सध्या कोकण रेल्वे क्षमता ओलांडून 140 टक्के रेल्वेगाड्या हाताळत आहे, त्यामुळे घाट व बोगदे मार्गांवर दुहेरीकरण (Double Line Project) आवश्यक आहे. मंगळूरकडून सपाट भागाचे सर्वेक्षण सुरू असून, सुमारे 265 किलोमीटरच्या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्याचा अहवाल तयार करून रेल्वे मंत्रालयाकडे निधीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.
भविष्यातील योजना
गेल्या 35 वर्षांपासून कोकण रेल्वेने सुरक्षित प्रवासी वाहतूक सुनिश्चित केली आहे. मात्र, आता रेल्वे रुळ, ओव्हरहेड वायर आणि इतर साहित्य नव्याने बसवण्याची गरज आहे. यासाठी 7,776 कोटी रुपयांचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात आला असून, मार्च 2026 पर्यंत मंजुरीची अपेक्षा आहे.
कोकणात गणेशोत्सव आणि दिवाळीच्या सणासुदीच्या हंगामात प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, कार रो-रो सेवा प्रवाशांसाठी खूप मोठा दिलासा ठरणार आहे, तसेच रस्त्यावरील गर्दी आणि वाहतुकीची अडचणही कमी होईल.