जागा वाटपावरून महाविकास आघाडीत वाद सुरू असल्याचे दिसून येत आहे. तर, दुसरीकडे महायुतीत सगळं काही आलबेल असल्याचा दावा केला जात होता. मात्र, महायुतीमध्येही नाराजीनाट्य सुरू आहे. महायुतीमध्ये भाजपने आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर या शिवसेना शिंदे गटाने भाजपच्या या पवित्र्यावर नाराजी व्यक्त केली.
कल्याण पूर्वसाठी शिवसेना आग्रही...
advertisement
भाजपने आपल्या पहिल्या यादीत ठाणे जिल्ह्यातील 18 पैकी 10 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. या यादीत कल्याण पूर्व येथील जागेचाही समावेश आहे. कल्याण पूर्वमधून गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली. आमदार गणपत गायकवाड यांनी वादातून शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केल्याने महेश गायकवाड यांच्यासह कल्याणमधील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना सोडण्याचा इशारा दिला आहे. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही जागा लढवण्याचा आग्रह केला आहे.
महायुतीत मुंबईत बैठकांवर बैठका...
कल्याण पूर्व जागेवरुन महायुतीत मुंबईत बैठकांवर बैठक सुरू आहेत. कल्याण पूर्वेच्या जागेकरता शिवसेना कमालीची आग्रही आहे. भाजपा पक्ष श्रेष्ठींकडे कल्याण पूर्व जागेबाबत आक्रमक भूमिका मांडण्यात आली. एकतर कल्याण पूर्व मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडा अथवा मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार रहा असे शिवसेना शिंदे गटाने म्हटले आहे. कल्याण पूर्वमधील सर्व शिवसेना पदाधिकारी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
