दिघे कुटुंबातील सदस्य निवडणुकीच्या मैदानात...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून केदार दिघे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. केदार दिघे हे दिवंगत शिवसेना नेते, ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. शिवसेना फुटीनंतर केदार दिघे यांना शिवसेना ठाकरे गटाने ठाणे जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली.
कोपरी पाचपाखाडी जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या विरोधात केदार दिघे हे शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित होत आहे. त्यामुळे शिंदे विरुद्ध दिघे असा सामना कोपरी पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळू शकतो.
advertisement
केदार दिघे हे मागील काही वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर केदार दिघे यांनी उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. शिंदे गटाकडून आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित करत ठाकरेंवर निशाणा साधला जातो. त्यावेळी केदार दिघे यांनी अनेकदा शिंदे गटावर पलटवार केला.
लवकरच उमेदवारी जाहीर होणार?
केदार दिघे यांनी ठाणे शहर आणि कोपरी पाचपाखडी या दोन्ही विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार, ठाणे शहरातून माजी खासदार राजन विचारे यांच्या नावाचा विचार शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी करण्यात येत आहे. त्यामुळे केदार दिघे हे कोपरी पाचपाखडी या एकनाथ शिंदे विद्यमान आमदार असलेल्या मतदारसंघातून शिंदेंच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केदार दिघे यांना लवकरच या सगळ्या संदर्भात पक्षाकडून आदेश दिले जाऊ शकतात.
