या प्रकल्पाबाबत महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली असून पालकमंत्री अजित पवार यांनी हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्य शासन स्तरावर या मार्गासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या महामार्गाची लांबी 135 किलोमीटर असणार असून हा चार लेनचा महामार्ग असेल. अंदाजे 12,500 कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पावर होणार आहे.
advertisement
सध्या शिक्रापूर, चाकण, तळेगाव आणि लोणावळा परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्रे आहेत. त्यामुळे या भागात वाहतुकीचा मोठा ताण आहे. हा नवा मार्ग तयार झाल्यानंतर पुण्यातील आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक 80 टक्क्यांनी कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच या मार्गामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन खर्च दोन्ही कमी होतील.
या महामार्गाचे काम बांधा-वापरा-हस्तांतरित करा तत्त्वावर करण्यात येणार आहे. म्हणजे हा मार्ग खाजगी कंपनीकडून बांधला जाईल आणि काही वर्षे वापर शुल्क घेऊन नंतर सरकारकडे हस्तांतरित केला जाईल.
प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत पूर्ण होईल.
पहिल्या टप्प्यात 60 किलोमीटर लांबीचा भाग पूर्ण केला जाईल.
दुसऱ्या टप्प्यात उर्वरित 75 किलोमीटर मार्गाचे काम केले जाईल. या प्रकल्पामुळे शिरूर, तळेगाव आणि कर्जत परिसरातील औद्योगिक तसेच कृषी व्यापाराला मोठी चालना मिळेल. तसेच मराठवाड्यातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना एक नवीन आणि सोपा पर्याय मिळेल.
शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर एका वर्षात भूसंपादनाचे काम पूर्ण केले जाईल आणि त्यानंतर दोन ते तीन वर्षांत हा महामार्ग तयार होण्याची शक्यता आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे ते मुंबई प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.