विजय वंजारा, प्रतिनिधी मुंबई: मुंबईतील दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अजब प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका महिलेनं भलताच कांड केला आहे. तिने आपल्या मुलीच्या प्रियकरालाच आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलं. तसेच त्याच्यासोबत पळून जाण्याचा प्लॅनही केला. त्यासाठी तिने आपल्याच पतीच्या घरात चोरी केली. एवढेच नव्हे, तर तिने दागिने प्रियकराला देऊन पतीवरच चोरीचे खोटे आरोप केले. पण दिंडोशी पोलिसांनी या महिलेचं बिंग फोडलं आहे. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असून तिच्याकडून सुमारे साडेदहा तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
advertisement
हे प्रकरण गोरेगाव पूर्वेकडील संतोषनगर, बीएमसी कॉलनी येथील आहे. येथील बीएमसी कर्मचारी रमेश धोंडू हळदीवे यांच्या घरात ही घटना घडली. रमेश यांची पत्नी उर्मिला रमेश हळदीवे यांनी अचानक पतीला सांगितले की, घरातील कपाटातून दागिने गायब आहेत. तिने थेट पती रमेश यांच्यावरच चोरीचा आरोप केला. रमेश यांनी आपल्याला याबद्दल काहीच माहिती नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर दोघांनी मिळून दिंडोशी पोलीस ठाण्यात दागिने चोरीची तक्रार दाखल केली.
पोलिसांच्या तपासातून सत्य समोर
दिंडोशी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तक्रारदार महिलेच्या बोलण्यात विसंगती आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तांत्रिक तपास करत आणि कॉल डिटेल्स तपासले असता एक धक्कादायक बाब समोर आली. पत्नी उर्मिला हिचे एका व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. उर्मिलाचे ज्याच्याशी प्रेमसंबंध सुरू होते, ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नव्हे तर तिच्या मुलीचा बॉयफ्रेंड असल्याचं देखील पोलीस तपासात समोर आलं.
पोलिसांनी अधिक तपास केल्यावर पत्नीनेच घरातून दागिने चोरून आपल्या प्रियकराला दिल्याचे समोर आले. या माहितीनंतर पोलिसांनी तत्काळ उर्मिलाला ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केली.या चौकशीत उर्मिलाने सर्व गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तिच्याकडून चोरलेले साडेदहा तोळे सोन्याचे दागिने जप्त केले. सध्या पोलीस तिची कसून चौकशी करत आहेत. या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे.