आज सकाळी 9-9.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गिरगाव चौपाटीजवळील मेट्रोच्या कामासाठी रस्त्याच्या खाली खोदकाम सुरू होते. याच वेळी बेस्टची प्रवासी बस त्या मार्गावरून जात असताना रस्त्याचा काही भाग अचानक खचला. परिणामी बसचा मागील भाग थेट खड्ड्यात घसरून अडकला. या दुर्घटनेमुळे प्रवाशांमध्ये क्षणभर भीतीचं वातावरण पसरलं.
बसमध्ये काही प्रवासी उपस्थित होते, मात्र स्थानिक नागरिकांनी तत्काळ पुढे येत सर्वांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. स्थानिकांनी मिळून तातडीने मदतकार्य सुरू केलं. खड्ड्यात अडकलेल्या बसला बाहेर काढण्यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत. ऐन सकाळच्या वेळी ही दुर्घटना घडल्याने परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
advertisement
मुंबई महानगरपालिका आणि मेट्रो प्रकल्प कार्यान्वित करणाऱ्या एजन्सीला याप्रकरणी नागरिकांनी जबाबदार धरत तीव्र संताप व्यक्त केला आहे. शहरात सतत सुरू असलेल्या पायाभूत प्रकल्पांच्या कामामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र अशा दुर्घटनांनी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने यापुढे अधिक दक्षता घेण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
भूमिगत मुंबई मेट्रोचे काम अद्याप सुरू आहे. वरळी नाका ते आरे जेव्हीएलआर या दरम्यान भूमिगत मेट्रो सुरू आहे. तर, वरळी नाका ते कफ परेड या दरम्यानचे मुंबई मेट्रोचे काम अद्यापही सुरू आहे. या वर्षाच्या अखेरीस भूमिगत मेट्रोचा हा टप्पा सुरू होणार असल्याचे म्हटल जात आहे.