सध्या चर्चगेट ते डहाणू दरम्यान उपनगरीय रेल्वेसेवा मर्यादित प्रमाणात चालतात. विशेषतहा विरार-डहाणू भागात दिवसभरात फक्त 6 ते 7 बेट गाड्या धावतात, ज्यामुळे प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. मात्र, चौपदरीकरणानंतर या मार्गावर लोकलच्या 200 पेक्षा अधिक फेऱ्या वाढविणे शक्य होणार आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नव्या मार्गिकेमुळे चर्चगेट ते डहाणू आणि विरार-डहाणू दरम्यान सेवा मोठ्या प्रमाणात वाढतील.
advertisement
प्रकल्पाच्या कामाची गती पाहता, केळवे-पालघरदरम्यान सध्या रूळ बसविण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी जमिनीचे सपाटीकरण आणि ब्लॅकेटिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. विशेष म्हणजे या नव्या मार्गिकांवरून गाड्या ताशी 160 किमी वेगाने धावू शकतील. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असून, प्रवाशांचा ताणही हलका होईल.
या प्रकल्पामुळे पश्चिम रेल्वेवरील मोठ्या समस्येचे निराकरण होणार आहे. सध्या विरार-डहाणूच्या दुहेरी मार्गावर उपनगरीय, मालवाहतूक आणि एक्सप्रेस गाड्या धावत असल्याने या भागातील रेल्वेसेवांवर प्रचंड ताण पडतो. कार्यक्षमतेत अडथळे निर्माण होतात, तसेच प्रवाशांच्या सोयीसुविधा मर्यादित राहतात. चौपदरीकरणानंतर उपनगरीय गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होणार असून, एक्सप्रेस आणि मालगाड्यांच्या सेवांवरही याचा सकारात्मक परिणाम होईल.
मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-3 अंतर्गत हा 64 किमी लांबीचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 3 कोटी 478 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या नव्या मार्गिकेमुळे पश्चिम उपनगरांतील वाढते शहरीकरण, वाढती लोकसंख्या आणि वाढत्या रेल्वे प्रवासाची मागणी पूर्ण होणार आहे.
अनेक वर्षांपासून प्रवाशांची विरार-डहाणू मार्गिका चौपदरीकरणाची मागणी होती. अखेर हा प्रकल्प रुळावर आला असून, 2027 पर्यंत पूर्ण झाल्यावर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. अतिरिक्त फेऱ्यांमुळे प्रवास अधिक सुकर आणि आरामदायी होईल. यामुळे मुंबई-पश्चिम उपनगरांतील रेल्वे प्रवासाच्या सुविधांना नवा आयाम मिळणार आहे.