सीएसएमटी येथे फलाट क्रमांक 12 आणि 13 यांची लांबी 24 डब्यांच्या गाड्या चालवण्यासाठी वाढवण्यात येत आहे. या फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. आता प्री नॉन-इंटरलॉकिंगचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन दिवसांत 15 तासांच्या मेगाब्लॉकची घोषणा करण्यात आलीये. यासाठी 2 ब्लॉक घेण्यात येणार आहेत. पहिला ब्लॉक शुक्रवारी रात्री 11.30 ते शनिवारी पहाटे 4.30 वाजेपर्यंत सीएसएमटी ते भायखळा अप आणि डाऊन जलद मार्गावर घेण्यात येईल. तर दुसरा 10 तासांचा ब्लॉक शनिवारी रात्री 11.15 ते रविवारी सकाळी 9.15 वाजेपर्यंत असणार आहे.
advertisement
मुंबईकरांना उष्णतेपासून मिळणार दिलासा, पुणे, नागपूर काय स्थिती? पाहा हवामान अंदाज
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते भायखळा अप-डाऊन जलद आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात उपनगरीय लोकलसेवा बंद राहणार आहे. तर मुख्य मार्गावरील लोकल सेवा भायखळा, परळ, दादर स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावरील लोकल वडाळा रोडपर्यंत चालवण्यात येईल.
शेवटची लोकल
शनिवारी सीएसएमटी स्थानकावरून शेवटची धीमी लोकल सीएसएमटी – ठाणे धीमी लोकल ही रात्री 10.46 वाजता सुटणार आहे. तर शेवटची जलद लोकल रात्री 10.41 वाजता सीएसएमटी – बदलापूर असणार आहे. हार्बर मार्गावरील शेवटची लोकल रात्री 10.34 वाजता सीएसएमटीहून पनवेलसाठी सुटेल, तर रात्री 11.24 वाजता सीएसएमटी – गोरेगाव लोकल धावणार आहे.
या मेल एक्स्प्रेस रद्द
सीएसएमटीवर घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे तीन मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये शनिवार-रविवारी ट्रेन क्रमांक 11008/07 पुणे सीएसएमटी डेक्क्न एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक 12128/27 पुणे सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस आणि ट्रेन क्रमांक 17618/17 नांदेड – सीएसएमटी तपोवन एक्स्प्रेस या गाड्या रद्द राहतील.