महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लि. (MMMOCL) ने जाहीर केले आहे की 12 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर या कालावधीत मेट्रो मार्गिका 2 अ (दहिसर पूर्व–डीएन नगर) आणि मार्गिका 7 (गुंदवली–ओवरीपाडा) या दोन्ही मार्गिकांवरील पहिली मेट्रो सकाळी 5:25 ऐवजी 7:00 वाजता सुटणार आहे. म्हणजेच मेट्रो सेवा नेहमीपेक्षा दीड तास उशिराने सुरू होईल.
advertisement
जोडणी आणि सुरक्षा चाचण्यांसाठी निर्णय
या तात्पुरत्या बदलामागे मोठं कारण आहे. गुंदवली ते ओवरीपाडा (मेट्रो 7) या मार्गिकेला दहिसर पूर्व ते काशिगाव (मेट्रो 9 / पहिला टप्पा) शी जोडण्याचे काम. या जोडणीसाठी आवश्यक प्रणाली एकत्रीकरण आणि सुरक्षा चाचण्या हाती घेतल्या जात आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर अंधेरी (पूर्व) ते मीरा-भाईंदर दरम्यान अखंड, सुसंगत आणि थेट मेट्रो सेवा उपलब्ध होणार आहे.
महामुंबई मेट्रोकडून सांगण्यात आलं आहे की, ''ही तात्पुरती वेळापत्रकातील सुधारणा अखंड मेट्रोसेवा सुरू करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे पश्चिम उपनगरांतील प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगवान होईल.''
थोडा बदल, पण दीर्घकालीन फायदा
सध्या मेट्रो मार्गिका 7 वर 13 स्थानकांदरम्यान सेवा सुरू आहे, आणि मार्गिका 9 चे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मेट्रो 9 सुरू झाल्यानंतर गुंदवली ते मीरा गाव असा थेट प्रवास शक्य होईल. यामुळे दहिसर, बोरीवली, कांदिवली, अंधेरीसह पश्चिम उपनगरांतील हजारो नोकरदार आणि विद्यार्थी प्रवासाचा मोठा वेळ वाचवू शकतील.
अद्ययावत वेळा
1)डहाणूकरवाडी → गुंदवली: सोम–शु 7:01, शनिवार 7:00, रविवार 7:04
2)डहाणूकरवाडी → अंधेरी पश्चिम: सोम–शु 7:06, शनिवार 6:58, रविवार 6:59
3)अंधेरी पश्चिम → गुंदवली: सोम–शु 7:01, शनिवार 7:02, रविवार 7:04
4)दहिसर पूर्व → अंधेरी पश्चिम: सोम–शु 6:58, शनिवार/रविवार 7:02
5)दहिसर पूर्व → गुंदवली: सोम–शु 6:58, शनिवार 7:06, रविवार 7:01
6)गुंदवली → अंधेरी पश्चिम: सोम–शु 7:06, शनिवार 7:02, रविवार 7:00
महामुंबई मेट्रोने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासाचे नियोजन करताना मुंबई 1 अॅप, अधिकृत सोशल मीडिया हँडल्स किंवा स्थानकावरील वेळापत्रक तपासावे.