मुकेश देव असं आत्महत्या करणाऱ्या ४५ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. ते मुंबई पोलीस दलात हवालदार पदावर कार्यरत होते. मुकेश देव यांनी शनिवारी दहीहंडीच्या दिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केली. मागील चार दिवसांत मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची ही दुसरी घटना आहे. देव यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पण अवघ्या चार दिवसांत दोन पोलिसांनी अशाप्रकारे मृत्यूला कवटाळल्याने मायानगरीत नक्की काय घडतंय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
advertisement
मुकेश देव हे मुंबई सशस्त्र पोलीस दलात कार्यरत होते. ते अंधेरी पूर्व येथील आगरकर बस आगाराजवळील पोलीस वसाहतीत राहत होते. शनिवारी दुपारी दहीहंडीचा उत्साह सुरू असतानाच त्यांनी आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला. ही घटना लक्षात आल्यानंतर शेजाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि देव यांना कूपर रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे पोलीस वसाहतीत शोककळा पसरली आहे. मुकेश देव यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. गेल्या चार दिवसांत मुंबईत दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने पोलीस दलातील मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यामागे मानसिक आरोग्याचं कारण आहे की आणखी काही? याचा सविस्तर तपास सुरू आहे. या दोन्ही घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? याचाही तपास पोलीस करत आहेत.