कांदिवली–बोरिवलीदरम्यान मोठे काम सुरू
कांदिवली ते बोरिवली हा पश्चिम रेल्वेवरील अत्यंत गजबजलेला भाग आहे. याच ठिकाणी सहाव्या मार्गिकेचे शेवटचे काम सुरू आहे. या टप्प्यात नवीन ट्रॅक जोडणे, सिग्नलिंग यंत्रणा बसवणे आणि ओव्हरहेड वायरची जोडणी केली जाणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर सहावी मार्गिका पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे.
रेल्वेचा मोठा निर्णय, ठाणे-मुलुंड दरम्यान नवं स्टेशन, लाखो प्रवाशांना दिलासा
advertisement
दररोज 80 लोकल फेऱ्या रद्द
या ट्रॅफिक ब्लॉकचा थेट फटका प्रवाशांना बसणार आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत दररोज सुमारे 80 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे.
एक्स्प्रेस गाड्यांच्या थांब्यांमध्ये बदल
1) ब्लॉकमुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत.
2) काही गाड्यांचा बोरिवली स्थानकावरील थांबा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे.
3) काही गाड्यांना अंधेरी आणि वसई रोड स्थानकांवर अतिरिक्त थांबे देण्यात आले आहेत.
4) यामुळे प्रवाशांनी आपल्या गाडीचा थांबा कुठे आहे, हे आधी तपासणे आवश्यक ठरणार आहे.
काम पूर्ण झाल्यावर काय फायदा होणार?
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, हे काम पूर्ण झाल्यानंतर मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लोकल मार्गिकेवरील ताण कमी होईल, लोकल गाड्या अधिक वेळेवर धावण्यास मदत होईल, भविष्यात लोकल फेऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
सहावी मार्गिका कधी सुरू होणार?
जर काम नियोजित वेळेत पूर्ण झाले, तर जानेवारी 2026 च्या अखेरीस कांदिवली–बोरिवली सहाव्या मार्गिकेवरून मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास सुरू होण्याची शक्यता रेल्वे सूत्रांनी व्यक्त केली आहे.
पश्चिम रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासापूर्वी अद्ययावत वेळापत्रक, रद्द किंवा बदललेल्या गाड्यांची माहिती रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट किंवा सोशल मीडिया हँडल्सवर तपासावी.






