तीन ठिकाणच्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास सुरू
वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम सध्या वेगात सुरू आहे. वरळीतील पहिल्या टप्प्यातील चावीवाटपानंतर आता नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांनाही त्यांच्या घरांच्या प्रतीक्षेचा शेवट जवळ येत आहे. नायगावमधील प्रकल्पाचे काम एल अँड टीकडून सुरू असून, नव्या इमारतींना अग्निशमन दलासह आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. म्हाडाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत.
advertisement
मुंबई-पालघरकरांसाठी गुड न्यूज! अडीच तासांचा प्रवास होणार केवळ तासभरात; प्रकल्पाला सरकारची मंजुरी
दोन टप्प्यांत 42 चाळींचा पुनर्विकास
नायगावमधील एकूण 42 बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जाणार आहे. या ठिकाणी 23 मजल्यांच्या 20 गगनचुंबी इमारती उभ्या राहतील. पहिल्या टप्प्यात आठ, तर दुसऱ्या टप्प्यात 12 इमारती बांधल्या जाणार आहेत. एकूण 3,344 रहिवाशांना या नव्या इमारतींमध्ये पुनर्वसन दिलं जाणार असून, पहिल्या टप्प्यातील 864 घरांच्या लॉटरीची प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण करण्यात आली आहे.
ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचं पहिल्या टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. सातपैकी दोन इमारतींमधील 342 रहिवाशांना येत्या डिसेंबरपर्यंत चाव्या मिळणार आहेत. उर्वरित पाच विंगमधील रहिवाशांना मार्च 2026 नंतर टप्प्याटप्प्याने घरांचा ताबा देण्यात येईल, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली.
रहिवाशांकडून भाडेवाढीची मागणी
नायगावमधील रहिवाशांना सध्या दरमहा 25 हजार रुपये भाडे दिलं जात आहे. मात्र, बांधकामाच्या कालावधीत वाढत्या खर्चाचा विचार करून हे भाडे वाढवून देण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित असून, म्हाडा लवकरच त्यावर विचार करणार असल्याचं समजतं.






