नवी मुंबईत बसस्थानकाचा अभाव मोठा
सायबर सिटी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईसारख्या आधुनिक शहरात अजूनही प्रवाशांसाठी स्वतंत्र बसस्थानक नाही. शहरातील बसस्थानकासाठी राखीव भूखंडावर ट्रक टर्मिनल उभारले गेले आहे, त्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना उभे राहून बसची वाट पाहावी लागते. प्रवाशांसाठी असलेल्या निवारा शेडची दुरवस्था झाली असून, त्या परिसरात अंधार असल्याने प्रवासी सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.
advertisement
सध्या वाशी पथकर नाका, वाशी प्लाझा, सानपाडा, जुईनगर, नेरुळ आणि सीबीडी बेलापूर येथे प्रवासी चढ-उतार करतात. मात्र बस बहुतांश वेळा एक ते दीड तास उशिराने येते. अशा परिस्थितीत निवारा शेडची सुविधा सुसज्ज असणे अत्यावश्यक आहे. गेल्या काही दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभागाने नवा शेड उभारला असला तरी काम अर्धवट राहिल्याने प्रवाशांना अंधारात थांबावे लागते.
रात्रीच्या वेळी या भागात खाद्यपदार्थ विकणाऱ्या गाड्यांची गर्दी वाढते, त्यात मद्यपींची वर्दळ वाढल्याने महिला प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. वाशी प्लाझा येथून दररोज सुमारे पाच हजार प्रवासी बसने प्रवास करतात त्यापैकी दोन हजार प्रवासी एसटी बसचा वापर करतात. परंतु निवारा शेडमध्ये केवळ दहा प्रवाशांना बसण्याचीच व्यवस्था आहे.
सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसात आणि सणासुदीच्या काळात प्रवाशांना उघड्यावर थांबावे लागत आहे. रात्रीच्या वेळी शेकडो प्रवासी एकाच वेळी उभे राहतात. कोट्यवधींचा महसूल देणाऱ्या नवी मुंबईत प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा न देणे ही मोठी प्रशासनिक उदासीनता मानली जात आहे.
