जबाब खोटे आणि काल्पनिक
शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीची मुलगी विधी मुखर्जीने सीबीआयवर गंभीर आरोप केले आहेत. सीबीआयच्या आरोपपत्रात दिलेले तिचे जबाब खोटे आणि काल्पनिक असल्याचा दावा तिने केला आहे. मंगळवारी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात साक्ष देण्यासाठी आली असताना विधीने आरोप केले आहे.
खोट्या केसमध्ये अडकवण्याचा कट
advertisement
विधीने असा आरोप केला की, सीबीआयने तिच्याकडून कोऱ्या कागदावर आणि ई-मेलच्या प्रतींवर जबरदस्तीने सह्या घेतल्या. नंतर हीच कागदपत्रे तिच्या नावाने जबाब म्हणून आरोपपत्रात सादर करण्यात आली. अशा प्रकारे तिच्या नावे खोटे जबाब आरोपपत्रात घालणे म्हणजे कोणाला तरी खोट्या केसमध्ये अडकवण्याचा कट असल्याचा आरोप विधी मुखर्जीने केला आहे.
कोट्यवधींचे दागिने आणि बँकेतील सात कोटी चोरीला
दरम्यान, आपल्या आईला, इंद्राणी मुखर्जीला, अडकवण्यासाठी सीबीआयने दबाव टाकल्याचा आरोपही तिने केला. तसेच, आईच्या अटकेनंतर तिचे कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि बँकेतील सात कोटी रुपये चोरीला गेल्याचंही तिनं म्हटलंय. विधीने असाही दावा केला की, शीना बोरा स्वतःला इंद्राणीची बहीण म्हणून ओळख देत होती. या प्रकरणात विधीच्या या दाव्यांमुळे नवीन वळण आले असून, सीबीआयच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.