पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी परिसरातील तक्षशिला नगर परिसरात ही घटना मंगळवारी रात्री घडली होती. २३ वर्षीय तरुण रात्री घरात झोपला होता. त्यावेळी त्याचे वडिल आणि आजोबा दारू पिऊन घरी आले. दोघेही घरात दारू प्यायला बसले होते. त्यावेळी वडिलांनी मुलाला शिवीगाळ करत होते. त्याला ओरडत होते. रात्री २ वाजेपर्यंत हा राडा घरात सुरू होता.
advertisement
वडील आणि आजोबाने या मुलाकडून काही पैसे मागितले होते. पण त्याने पैसे देण्यासाठी नकार दिला. त्यामुळे दारूच्या नशेत तर्राट झालेल्या दोघांनी या तरुणाला शिवीगाळ केली. त्यामुळे संतापलेल्या या तरुणाने घरात असलेल्या भाजी चिरण्याचा चाकू उचलला आणि ५२ वर्षीय वडिलांवर हल्ला चढवला. हे पाहून या तरुणाचे आजोबा दोघांना सोडवण्यासाठी धावून आले. पण मुलाने ७५ वर्षांच्या आजोबांवर सुद्धा चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात या तरुणाचा काका सुद्धा जखमी झाला. काही क्षणात दोघेही रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. हे पाहून तो पुरता हादरून गेला.
घरात किंचळण्याचा आवाज ऐकून शेजारी धावून आले. शेजाऱ्यांनी जखमी काकाला तातडीने जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. त्यानंतर मुलाने चाकू घेऊन MIDC पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजर झाला. पोलिसांच्या एका टीमने तातडीने तरुणाच्या घरी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे.
