ठाणे : कबुतराला विजेच्या तारेवरून वाचवण्याच्या प्रयत्नात ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशामक दलातील तरुण जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दिवा परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. कबुताराचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतःचा जीव गमवावा लागल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मृत जवानाचे नाव उत्सव पाटील (वय २५) असे असून ते ठाणे अग्निशामक दलात कार्यरत होते. सोमवारी दुपारी दिवा परिसरात विजेच्या तारेवर एक कबुतर अडकल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाला दिली. तत्काळ उत्सव पाटील घटनास्थळी दाखल झाले. मात्र, कबुतराला वाचवण्यासाठी उंचावर गेले असता त्यांना हायव्होल्टेज विजेचा जबर धक्का बसला. जागीच ते बेशुद्ध पडले.
advertisement
सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. परंतु रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकली आणि उपचारासाठी विलंब झाा. अखेर कळवा रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी उत्सव पाटील यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे ठाणे महापालिका आणि अग्निशामक विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रशासनावर तीव्र संताप
स्थानिक नागरिक आणि सहकारी जवानांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.ज्यांनी नागरिकांच्या जीवासाठी स्वतःचे प्राण पणाला लावले, त्यांनाच योग्य सुरक्षा मिळत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे,असे नागरिकांनी सांगितले. सुरक्षासाधनांचा अभाव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुपस्थिती या कारणांमुळे ही दुर्घटना घडल्याचे आरोपही करण्यात येत आहेत.
चौकशी करण्याचे आदेश
दरम्यान या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, जबाबदारांवर कारवाईची मागणी वाढली आहे. उत्सव पाटील यांच्या मृत्यूने ठाणे अग्निशामक दल शोकाकुल झाले आहे. नागरिकांच्या सेवेसाठी धावणाऱ्या या तरुण जवानाच्या बलिदानाने प्रशासनाच्या निष्काळजी व्यवस्थेचा भंडाफोड केला आहे.