मरोळमधील भीषण घटनेने हादरली मुंबई
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरोळ येथील एका बांधकामस्थळी सिमेंट ब्लॉक्स पोहोचवण्यासाठी नाशिकहून ट्रकद्वारे साहित्य आणण्यात आले होते. ट्रक चालक अनिल कचरू कोकणे आणि त्याचा मदतनीस अमर पगारे हे दोघे सकाळी त्या ठिकाणी पोहोचले. सामान उतरण्याचे काम सुरू असताना चालक कोकणे ट्रकमध्ये काही वेळ झोपला होता तर अमर खाली उतरून जागेवर उभा होता.
advertisement
अचानक सातव्या मजल्यावरून एक जड लोखंडी सळई वेगाने खाली कोसळली आणि ती थेट अमरच्या डोक्यात आदळली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच कोसळला. आसपास उपस्थित मजुरांनी तत्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी अमरला मृत घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात बांधकामस्थळावर आवश्यक सुरक्षात्मक उपाय न केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात बांधकाम प्रकल्पातील जबाबदार ठेकेदार आणि साइटवरील अधिकाऱ्यांविरुद्ध निष्काळजीपणाने मृत्यू घडवल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे, अशी माहिती परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरू केला असून, या दुर्घटनेमुळे बांधकामस्थळी सुरक्षेच्या नियमांकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा समोर आला आहे.
