भानुप्रताप बर्गे सांगतात की, “आज दहशतवादी संघटना अत्यंत नियोजनपूर्वक तरुणांचं ब्रेनवॉशिंग करत आहेत. धर्माच्या नावाखाली कट्टरता रुजवली जाते. शिक्षण, संस्कार आणि कौटुंबिक पार्श्वभूमी यांचा विसर पडतो. 20 ते 35 वयोगटातील तरुण सर्वाधिक धोक्यात असतात, कारण त्यांचं विचारविश्व अजूनही प्रभावाखाली येण्यास सुलभ असतं.”
सध्या या प्रक्रियेमध्ये सोशल मीडियाचा सर्वात मोठा वाटा आहे. फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम किंवा डार्क वेबच्या माध्यमातून दहशतवादी संघटना आपली विचारसरणी पसरवत असतात. त्यांचं नेटवर्क जागतिक पातळीवर कार्यरत असतं. इस्लामी स्टेट सारख्या संघटना आपल्या देशात अशांतता निर्माण करण्याचं, समाजात दुभंग पाडण्याचं आणि आर्थिक स्थैर्य डळमळीत करण्याचं काम करतात, असं त्यांनी सांगितलं.
advertisement
बर्गे पुढे म्हणाले की, “जेव्हा देशात दंगली, अविश्वास आणि भीतीचं वातावरण तयार होतं, तेव्हा देशाची प्रतिमा जगभरात खराब होते. गुंतवणूकदार मागे हटतात आणि त्यामुळे देशाच्या प्रगतीला खीळ बसते. त्यामुळे हे फक्त धार्मिक किंवा राजकीय नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेचं गंभीर संकट आहे.”
काही शैक्षणिक संस्था किंवा धार्मिक प्रशिक्षण केंद्रं यामध्ये मोठी भूमिका बजावतात. लहानपणापासून एका विशिष्ट विचारसरणीचं शिक्षण दिलं जातं आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मानसिकता तपासली जाते. पूर्वी अशिक्षित आणि गरीब लोक दहशतवादाकडे ओढले जात असत. मात्र आता उच्चशिक्षित वर्ग या सापळ्यात अडकू लागल्याने धोका अधिक गंभीर बनला आहे.
भानुप्रताप बर्गे यांनी सामान्य नागरिकांनाही सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी सांगितलं की, आपल्या परिसरात कुठे काही संशयास्पद घडत असेल, काही अनोळखी व्यक्ती वारंवार येत-जात असतील, तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ पोलिसांना माहिती द्या. तसेच, आपण घर किंवा फ्लॅट भाड्याने देत असाल, तर संबंधित व्यक्तीची सगळी कागदपत्रं आणि ओळख पटवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
शासन आणि सुरक्षा यंत्रणांनाही अधिक बळकट गुप्तचर नेटवर्क उभारण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं. आजचा दहशतवाद हा फक्त गोळ्या आणि बॉम्बपुरता मर्यादित नाही तो सायबर हल्ले, आर्थिक फसवणूक आणि विचारसरणीचं शस्त्र म्हणून पसरत आहे, असं बर्गे यांनी स्पष्ट केलं.
देशातील युवकांचं शिक्षण, नोकरी आणि विचारसरणी सकारात्मक दिशेने जावी यासाठी समाज, पालक आणि शासनाने एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. अन्यथा, उच्चशिक्षित मेंदू जर दहशतवादाचं शस्त्र बनले, तर त्याचे परिणाम देशासाठी अत्यंत घातक ठरू शकतात, असंही बर्गे सांगतात.





