मुंबई : मुंबई, ठाणे भागात 7 जुलै रोजी रात्रीपासूनच पावसानं दमदार हजेरी लावली. या पावसामुळे 8 जुलै रोजी सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झाले. जोरदार कोसळलेल्या पावसाचं पाणी अनेक भागातील लोकलच्या ट्रॅकमध्ये साचलं. याचा परिणाम लोकलवर झालाय. मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तीनही मार्गांवरील गाड्या उशिरानं धावत असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आलीये.
advertisement
ठाण्याच्या पुढे लोकल ट्रेन बंद असून भांडूप आणि कुर्ला या स्थानकांवर पाणी साचलंय. त्यामुळे सकाळी ऑफिसला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली. तसंच रात्रभर कोसळलेल्या पावसाचा परिणाम एक्स्प्रेस गाड्यांवरही झाला. पुणे-मुंबई रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय, तर सिंहगड आणि डेक्कन एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. प्रगती, मनमाड-मुंबई, पंचवटी या एक्स्प्रेससुद्धा रद्द केल्या आहेत.
हेही वाचा : 10 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस; पुण्यात अतिजोरदार पावसाची शक्यता!
सिंहगड आणि डेक्कन एक्स्प्रेसनं दररोज मुंबईला कामासाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यांना या पावसाचा फटका बसलाय. शिवाय पावसाचा जोर वाढतच असल्यामुळे एक्स्प्रेस आणि लोकल किती वेळानं नियमित वेळेनुसार धावतील हेही निश्चितपणे सांगता येत नाहीये.
दरम्यान, मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या एक्सप्रेसही खूप उशिरानं धावत आहेत. तसंच सेवाग्राम एक्स्प्रेस मुंबईऐवजी नाशिकहून सोडण्यात आली. तर, विदर्भ एक्स्प्रेस आणि दुरंतो एक्स्प्रेस अजूनही मुंबईतून नागपूरसाठी सुटलेल्या नसल्याची माहिती समोर येतेय. शिवाय कधी सुटतील याबद्दलही काही माहिती नाही.