मुंबई : यंदा पावसाची सुरूवातच दमदार झाली. त्यामुळे अनेक महिने उकाड्यानं त्रस्त झालेले राज्यातील नागरिक पहिल्याच पावसात अगदी ओलेचिंब झाले. अनेक ठिकाणी पावसामुळे नुकसानही झालं. परंतु नंतर मात्र पावसानं अशी काही उघडीप घेतली की, हवामानशास्त्र विभागानं मुसळधार पावसाचा अंदाज देऊनही नागरिकांचा विश्वास बसेनास झाला होता. पण हवामानशास्त्र विभागानं दिलेला अंदाज खरा ठरला असून मुंबई, ठाण्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केलीये.
advertisement
7 जुलैच्या रात्री मुसळधार पाऊस कोसळला. 8 जुलै रोजी मुंबई, परिसर आणि उपनगरातील नागरिकांची सकाळ धो धो पावसानंच झाली. रात्रभर कोसळलेल्या तुफान पावसाचं पाणी ठिकठिकाणी साचलं असून, पाऊस सुरूच असल्यानं पाणी ओसरायलाही काही वाव नाही. याचा फटका लोकलच्या तीनही मार्गांना बसला. लोकल गाड्या उशिरानं धावत असून अनेक एक्स्प्रेसही रद्द करण्यात आल्या. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांचे हाल झाले.
हेही वाचा : रात्रभर जोरदार पाऊस, तीनही मार्गांवरील लोकल उशिरानं! डेक्कन, सिंहगड एक्स्प्रेस रद्द
रविवारी रात्री मुंबई शहराला पावसानं पुरतं झोडपलं. मुंबईच्या असल्फा, साकीनाका, जेबी नगर, विक्रोळी, घाटकोपर, चकाला, अंधेरी या परिसरातील सखल भागात सकाळपासून पाणी साचायला सुरूवात झाली. साचलेल्या या पाण्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं.
अनेक ठिकाणची रस्ते वाहतूकही कोलमडली. लोकलनं नाही तर नाहीच पण इतर गाड्यांनीही कामावर पोहोचायला उशीर झाल्यानं ठिकठिकाणी नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. पावसाचा जोर कायम राहिल्यास रस्ते जाम होण्याची शक्यता आहे. सध्या मंद गतीनं वाहनं पुढे सरकत आहेत.