एअर इंडियाने जारी केलेल्या अधिकृत मार्गदर्शक सूचनेनुसार विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना चेक-इन आणि बोर्डिंगची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडता यावी, यासाठी त्यांनी वेळेत विमानतळावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. कंपनीने स्पष्टपणे सांगितले आहे की, विमानाचे प्रस्थान होण्याच्या 75 मिनिटे आधी चेक-इन काउंटर बंद करण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांनी कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी वेळेचे पालन करावे.
advertisement
पाकिस्तानकडून भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला; लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले
एअर इंडियाच्या निवेदनात म्हटले आहे, नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या आदेशानुसार विमानतळांवर सुरक्षा उपाय वाढवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरातील प्रवाशांना सूचित करण्यात येते की त्यांनी त्यांच्या विमानप्रस्थानाच्या निर्धारित वेळेच्या किमान तीन तास अगोदर आपापल्या विमानतळांवर पोहोचावे. यामुळे त्यांना सुरळीतपणे चेक-इन आणि बोर्डिंग करता येईल. प्रस्थान वेळेच्या ७५ मिनिटे आधी चेक-इन बंद केले जाईल.
केवळ एअर इंडियाच नव्हे तर आकासा एअरने देखील आपल्या प्रवाशांसाठी अशाच प्रकारची सूचना जारी केली आहे. आकासा एअरने आपल्या मार्गदर्शक सूचनेत म्हटले आहे की, भारतभरातील सर्व विमानतळांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्यामुळे आम्ही आमच्या प्रवाशांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या प्रस्थानाच्या वेळेपूर्वी किमान ३ तास अगोदर विमानतळावर पोहोचावे. जेणेकरून त्यांना कोणताही त्रास न होता चेक-इन आणि बोर्डिंगचा अनुभव घेता येईल.
आकासा एअरने प्रवाशांना विमानतळात प्रवेशासाठी वैध सरकारी ओळखपत्र सोबत ठेवण्याचेही निर्देश दिले आहेत. यासोबतच चेक-इन केलेल्या सामानाव्यतिरिक्त केवळ 7 किलो वजनाच्या एका हँडबॅगला परवानगी असेल. कंपनीने पुढे सांगितले की, नियमांनुसार सर्व प्रवाशांना बोर्डिंगपूर्वी दुय्यम सुरक्षा तपासणीतून जावे लागेल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सध्याची परिस्थिती पाहता विमान कंपन्यांनी घेतलेला हा निर्णय प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. प्रवाशांनी या सूचनांचे गांभीर्याने पालन करून विमानतळावर वेळेत पोहोचणे अपेक्षित आहे. जेणेकरून त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
