सोलापूरसह दक्षिणेकडील भागात यंदा पावसाचा जोर अपेक्षेपेक्षा जास्त होता. या अतिवृष्टीमुळे शेवग्याची मोठ्या प्रमाणात फुले गळून गेली, काही ठिकाणी झाडांचंच नुकसान झालं. परिणामी उत्पादन घटलं आणि पुणे बाजारात आवक लक्षणीयरीत्या कमी झाली. सोमवारी तर फक्त 400 ते 500 किलोच शेवगा मार्केट यार्डात दाखल झाला. जी आवक पूर्वी दररोज चार ते पाच हजार किलो असायची, ती आता काहीशे किलोपर्यंत आल्याने पुरवठा-मागणीचे गणित बिघडले आहे.
advertisement
Success Story : बारावीपास शेतकऱ्यानं लावलं डोकं, एका एकरात घेतलं दुहेरी पिक, उत्पन्न मिळणार लाखात
घाऊक बाजारात दहा किलो शेवग्याचे दर तब्बल तीन हजारांपर्यंत पोहोचले असल्याची माहिती अडते वर्गातून देण्यात आली. किरकोळ बाजारात हा दर 350 ते 400 रुपये किलोपर्यंत आहे. थंडीचा काळ असल्यामुळे शेवगा उष्ण गुणधर्माचा असल्याने त्याची मागणी वाढते. मात्र आवक जास्त नसल्याने दरात विक्रमी वाढ होत आहे.
जयंत कोरके यांनी सांगितले की, सध्या पुण्यातील मार्केट यार्डात स्थानिक आवक खूपच कमी आहे. थोडेसेच स्थानिक उत्पादन बाजारात दिसते. सध्या येणारा माल हा मुख्यतः गुजरातमधून येतो. अतिवृष्टीमुळे सिझन लेट झाला आहे. फुले गळून गेल्यामुळे उत्पन्न कमी झालं आणि आवक घटली. त्यामुळे दर आपोआप वाढले आहेत.
मागील काही दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता परिस्थिती अधिक स्पष्ट होते. 23 नोव्हेंबर रोजी बाजारात फक्त 13 क्विंटल शेवग्याची आवक झाली. 25 नोव्हेंबरला ही आवक 15 क्विंटलपर्यंत पोहोचली. मात्र मंगळवारी ती 30 क्विंटलवर गेली असली तरी मागणीच्या तुलनेत ती खूपच कमी आहे. आवक कमी आणि मागणी स्थिर असल्यामुळे दर अजून काही दिवस उच्चांकी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरवाढीमुळे सामान्य ग्राहकांवर आर्थिक ताण वाढला आहे. भाज्यांच्या वाढत्या किमतींमध्ये शेवग्याने आता नवीन विक्रम प्रस्थापित केल्याने सामान्य ग्राहकांना शेवगा परवडेनासा झाला आहे. आगामी काळात उत्पादन पुन्हा सुरळीत झाल्यास दरात काही प्रमाणात उतर दिसू शकेल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.





