शेवगा झाला चिकनपेक्षा महाग, किलोला मोजावे लागत आहेत तब्बल एवढे रुपये, कारण काय?
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
थंडीच्या सुरुवातीसोबतच बाजारात शेवग्याचे दर आकाशाला भिडले आहेत. नेहमी 100 ते 150 रुपये किलोने मिळणारा शेवगा सध्या प्रतिकिलो तब्बल 300 रुपयांपेक्षा अधिक महाग विकला जात आहे.
पुणे : थंडीच्या सुरुवातीसोबतच बाजारात शेवग्याचे दर आकाशाला भिडले आहेत. नेहमी 100 ते 150 रुपये किलोने मिळणारा शेवगा सध्या प्रतिकिलो तब्बल 300 रुपयांपेक्षा अधिक महाग विकला जात आहे. मार्केट यार्डातील आवक घटली असून दक्षिण महाराष्ट्रातील पावसामुळे झालेलं उत्पादनाचं नुकसान आणि सध्या वाढलेली मागणी या तिन्ही कारणाने ग्राहकांच्या खिशाला जोरदार फटका बसत आहे.
सोलापूरसह दक्षिणेकडील भागात यंदा पावसाचा जोर अपेक्षेपेक्षा जास्त होता. या अतिवृष्टीमुळे शेवग्याची मोठ्या प्रमाणात फुले गळून गेली, काही ठिकाणी झाडांचंच नुकसान झालं. परिणामी उत्पादन घटलं आणि पुणे बाजारात आवक लक्षणीयरीत्या कमी झाली. सोमवारी तर फक्त 400 ते 500 किलोच शेवगा मार्केट यार्डात दाखल झाला. जी आवक पूर्वी दररोज चार ते पाच हजार किलो असायची, ती आता काहीशे किलोपर्यंत आल्याने पुरवठा-मागणीचे गणित बिघडले आहे.
advertisement
घाऊक बाजारात दहा किलो शेवग्याचे दर तब्बल तीन हजारांपर्यंत पोहोचले असल्याची माहिती अडते वर्गातून देण्यात आली. किरकोळ बाजारात हा दर 350 ते 400 रुपये किलोपर्यंत आहे. थंडीचा काळ असल्यामुळे शेवगा उष्ण गुणधर्माचा असल्याने त्याची मागणी वाढते. मात्र आवक जास्त नसल्याने दरात विक्रमी वाढ होत आहे.
advertisement
जयंत कोरके यांनी सांगितले की, सध्या पुण्यातील मार्केट यार्डात स्थानिक आवक खूपच कमी आहे. थोडेसेच स्थानिक उत्पादन बाजारात दिसते. सध्या येणारा माल हा मुख्यतः गुजरातमधून येतो. अतिवृष्टीमुळे सिझन लेट झाला आहे. फुले गळून गेल्यामुळे उत्पन्न कमी झालं आणि आवक घटली. त्यामुळे दर आपोआप वाढले आहेत.
मागील काही दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता परिस्थिती अधिक स्पष्ट होते. 23 नोव्हेंबर रोजी बाजारात फक्त 13 क्विंटल शेवग्याची आवक झाली. 25 नोव्हेंबरला ही आवक 15 क्विंटलपर्यंत पोहोचली. मात्र मंगळवारी ती 30 क्विंटलवर गेली असली तरी मागणीच्या तुलनेत ती खूपच कमी आहे. आवक कमी आणि मागणी स्थिर असल्यामुळे दर अजून काही दिवस उच्चांकी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
advertisement
दरवाढीमुळे सामान्य ग्राहकांवर आर्थिक ताण वाढला आहे. भाज्यांच्या वाढत्या किमतींमध्ये शेवग्याने आता नवीन विक्रम प्रस्थापित केल्याने सामान्य ग्राहकांना शेवगा परवडेनासा झाला आहे. आगामी काळात उत्पादन पुन्हा सुरळीत झाल्यास दरात काही प्रमाणात उतर दिसू शकेल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Nov 26, 2025 9:12 PM IST









