अमित शाह यांनी लोकसभेत आपल्या भाषणाला सुरुवात करण्याआधीच भारतीय सुरक्षा दलाने राबवलेल्या 'ऑपरेशन महादेव'ची माहिती दिली. सोमवारी झालेल्या या कारवाईत तीन दहशतवादी मारले गेले. ही कारवाई लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू पोलिसांनी केली. भाषणादरम्यान गृहमंत्री अमित शहा म्हणाले की पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले गेले असल्याचे सांगितले.
अमित शाह यांनी सांगितले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच 22 मे रोजीच ऑपरेशन महादेव सुरू करण्यात आले. 23 एप्रिल रोजी झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत दहशतवाद्यांना कोणत्याही परिस्थितीत देशाबाहेर जाऊ दिले जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला. गुप्तचर अधिकारी या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी टेकड्यांवर फिरत राहिले. त्यानंतर सेन्सर्सद्वारे त्यांच्याबद्दल माहिती मिळाली आणि 28 जुलै रोजी त्यांचा खात्मा करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.
advertisement
दहशतवादी पाकिस्तानीच कसे? अमित शाह यांनी पुरावे सांगितले...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, काही जणांकडून दहशतवादी पाकिस्तानी आहेत का, असा सवाल केला जात होता. आमच्याकडे हे दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे सबळ पुरावे असल्याचे शाह यांनी सांगितले. चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांचे पाकिस्तानमधील मतदार यादी क्रमांक तपास यंत्रणांकडे आहे. त्याशिवाय, या दहशतवाद्यांकडे असलेल्या रायफली पाकिस्तानच्या असल्याचे त्यांनी सांगितले. या दहशतवाद्यांकडे काही वस्तू आढळल्या. त्यातील चॉकलेट्सही पाकिस्तानी असल्याची माहिती शाह यांनी लोकसभेत दिली.
दहशतवाद्यांची ओळख पटवली...
एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांना आधीच ताब्यात घेतले होते. दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर त्यांना ओळख पटवण्यासाठी आणण्यात आले. त्यांनीच या दहशतवाद्यांना ओळखले. मात्र, पहलगामच्या मारेकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी आम्ही इतरही मदत घेतली. आम्ही अनेक तांत्रिक मदत घेतली आणि या दहशतवाद्यांना ओळखले असल्याचे शाह यांनी म्हटले.