तिरुवल्लूर: तमिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यात सापाने चावल्यामुळे मृत्यू झाल्याची एक घटना समोर आली होती. सुरुवातीला हा अपघात वाटत असतानाच, पोलिसांनी आता यामागील एका भीषण आणि थंड डोक्याने केलेल्या हत्येचा खुलासा केला आहे. 3 कोटी रुपयांच्या विम्याची रक्कम लाटण्यासाठी सख्ख्या मुलांनीच वडिलांच्या हत्येचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
advertisement
3 कोटींसाठी पित्याची हत्या
अपघातात मृत 56 वर्षीय ई.पी. गणेशन हे एका सरकारी शाळेत प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून कार्यरत होते. 22 ऑक्टोबर रोजी तिरुवल्लूर जिल्ह्यातील पोथतुरपेट्टई येथील राहत्या घरी ते मृतावस्थेत आढळले. त्यांच्या शरीरावर सापाने चावल्याच्या खुणा होत्या. गणेशन यांचा मुलगा मोहनराज (26) याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली होती.
विमा कंपनीच्या शंकेने बिंग फुटले या प्रकरणाला कलाटणी तेव्हा मिळाली जेव्हा एका विमा कंपनीने दाव्याची प्रक्रिया (Insurance Claim) करताना पोलिसांना सावध केले. गणेशन यांच्या नावाने अनेक उच्च-मूल्य असलेल्या जीवन विमा पॉलिसी घेतल्या गेल्या होत्या आणि त्यांचे लाभार्थी त्यांच्या मृत्यूच्या बदल्यात मोठी रक्कम मागत होते. ही बाब संशयास्पद वाटल्याने उत्तर परिमंडळाचे पोलीस महानिरीक्षक असरा गर्ग (IPS) यांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले.
तिरुवल्लूरचे पोलीस अधीक्षक विवेकानंद शुक्ला यांनी माहिती दिली की, मुलांनी त्यांच्या वडिलांचा तब्बल 3 कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. हाच या गुन्ह्यामागचा मुख्य आर्थिक उद्देश होता.
हत्येचा थरारक कट: सापाचा वापर तपासादरम्यान समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. मुलांनी वडिलांचा मृत्यू सापाच्या दंशाने झाल्याचा बनाव करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली.
पहिला प्रयत्न : हत्येच्या साधारण एक आठवड्यापूर्वी मुलांनी एका कोब्रा सापाची व्यवस्था केली होती आणि गणेशन यांच्या पायाला दंश घडवून आणला होता. मात्र तो दंश प्राणघातक ठरला नाही आणि त्यांचा हा प्लॅन फसला.
पहिला प्रयत्न : हार न मानता आरोपींनी पुन्हा कट रचला. घटनेच्या दिवशी पहाटेच्या सुमारास त्यांनी अत्यंत विषारी अशा 'मण्यार' (Krait) जातीचा साप घरात आणला. हा साप जाणीवपूर्वक गणेशन यांच्या मानेला (जे शरीरातील संवेदनशील आणि प्राणघातक ठिकाण आहे) चावायला लावला. यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न वडिलांचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर, साप चुकून घरात शिरला असावा असा बनाव करण्यासाठी त्यांनी त्या सापाला घरातच मारून टाकले. तसेच गणेशन यांना रुग्णालयात नेण्यास जाणीवपूर्वक उशीर करण्यात आला, जेणेकरून वैद्यकीय मदतीअभावी त्यांचा मृत्यू निश्चित होईल.
या प्रकरणी पोलिसांनी गणेशन यांच्या दोन मुलांसह एकूण 6 जणांना अटक केली आहे. यामध्ये साप पकडून देणारे आणि या कटात मदत करणाऱ्या इतर चौघांचा समावेश आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
