कुठे घडली घटना?
उत्तर प्रदेशातील नोएडा शहरात पुन्हा एकदा भरधाव वेगाचा कहर पाहायला मिळाला. रात्री उशिरा गुलशन मॉल तिठ्यावर भरधाव डिफेंडर कार अनियंत्रित झाली आणि रस्त्यावरून जाणाऱ्या ५ चारचाकी गाड्या व एका मोटारसायकलला तिने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अनेक वाहनांचे मोठे नुकसान झालं. ही घटना एक्सप्रेस-वे पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली.
advertisement
पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, UP16EN1111 या रजिस्ट्रेशन नंबरची डिफेंडर कार अनियंत्रित झाली आणि तिने रस्त्यावरील पाच कार आणि एका दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, घटनेनंतर धडक बसलेल्या सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे, तर बाइकचंही नुकसान झालं.अपघात घडवणाऱ्या कारचा चालक सुनीत नावाचा तरुण होता, जो नोएडातील सेक्टर १०० मध्ये राहणारा आहे.
चालकाला अटक, घटनास्थळावर काय स्थिती?
चालक निष्काळजीपणे गाडी चालवत होता, असे पोलिसांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी सुनीतला अटक केली. नोएडा पोलीस आयुक्तालयाच्या मीडिया सेलने ही माहिती दिली आहे की, कार चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवताना गुलशन मॉल तिठ्यावर ही दुर्घटना घडवली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी सध्या डिफेंडर कारसह सर्व अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली आहेत. आरोपी चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर आवश्यक कायदेशीर कारवाई केली जात आहे.