दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ झालेल्या कार स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. या स्फोटात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २४ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा बॉम्बस्फोट होता की वेगळं काही याचा तपास पोलीस यंत्रणांकडून सुरू आहे.
advertisement
दरम्यान आता या स्फोटामागे एका प्लंबरचा आणि टीपर ड्रायव्हरचा हात असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी सायंकाळी उशिरा दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. आमिर राशीद मीर आणि तारिक दार असं ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींची नावं आहेत. दिल्ली स्फोटात वापरलेली i20 सगळ्यात शेवटी आमिर मीर नावाच्या व्यक्तीने खरेदी केली होती. आमिर हा एक प्लंबर असून तो जम्मू काश्मीरमधील संबुरा येथील रहिवासी आहे. रात्री उशिरा पोलिसांनी त्याला उचललं असून एसओजी आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
रात्री ताब्यात घेतलेला दुसरा आरोपी तारिक दार पुलवामा येथील रहिवासी असून तो निवृत्त लेखपालाचा मुलगा आहे. तो एका टिप्परवर चालक म्हणूनही काम करतो. पोलिसांनी रात्री उशिरा दोघांना ताब्यात घेतलं आहे. या स्फोटामागे त्यांचं काय कनेक्शन आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत.
200 CCTV तपासले, 13 संशयित चौकशीखाली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल किल्ला स्फोट तपासात पोलिसांनी बदरपूर बॉर्डरपासून सुनहरी मशीद पार्किंगपर्यंत आणि आउटर रिंग रोड–काश्मिरी गेट–लाल किल्ला रूटवरील सर्व सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले आहेत. या तपासासाठी सुमारे 200 पोलीस कर्मचाऱ्यांना विविध रूट्सवर नेमण्यात आले होते. अनेक ठिकाणांवरून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुमारे 13 जणांवर संशय व्यक्त करण्यात आला असून, त्यांची सध्या सखोल चौकशी सुरू आहे. अपघातापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉ. उमर हा फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. तोच I-20 कारमध्ये होता का? याचा तपास पोलीस करत आहेत.
