दिल्लीतील एका 45 वर्षीय व्यक्तीने AI च्या सल्ल्यावर विश्वास ठेवून डॉक्टरांचा सल्ला न घेता थेट HIV प्रतिबंधक औषधे घेतली. या चुकीच्या निर्णयाचा परिणाम असा झाला की त्या व्यक्तीला Stevens-Johnson Syndrome हा दुर्मिळ पण अत्यंत जीवघेणा आजार झाला असून सध्या तो आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हाय-रिस्क लैंगिक संबंधानंतर संबंधित व्यक्तीने AI प्लॅटफॉर्मवरून माहिती घेतली. त्यानंतर कोणतेही प्रिस्क्रिप्शन न घेता त्याने थेट स्थानिक केमिस्टकडून HIV पोस्ट-एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस (PEP) औषधांचा 28 दिवसांचा संपूर्ण कोर्स खरेदी केला.
advertisement
डॉ. राम मनोहर लोहिया (RML) रुग्णालयातील डॉक्टरांच्या माहितीनुसार, ही औषधे संभाव्य HIV संपर्कानंतर संसर्ग रोखण्यासाठी दिली जातात आणि तीही फक्त 72 तासांच्या आत, वैद्यकीय तपासणीनंतरच सुरू केली जातात. मात्र या व्यक्तीने कोणतीही चाचणी, जोखीम न विचारत घेता तसेच डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधोपचार सुरू केले.
7 दिवसांतच दिसू लागले गंभीर दुष्परिणाम
सुमारे सात दिवस औषधे घेतल्यानंतर रुग्णाच्या अंगावर तीव्र पुरळ, त्वचेवर फोड आणि डोळ्यांसह शरीरातील इतर अवयवांमध्ये गंभीर त्रास सुरू झाला. स्थिती बिघडल्याने त्याला तातडीने RML रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तपासणीत डॉक्टरांनी त्याला Stevens-Johnson Syndrome असल्याचे निदान केले. हा आजार औषधांच्या तीव्र रिअॅक्शनमुळे होतो, ज्यात त्वचा आणि शरीरातील श्लेष्मल झिल्ली (mucosa) सोलून निघू लागते. डॉक्टरांच्या मते ही अवस्था अत्यंत दुर्मिळ असून जीवाला मोठा धोका निर्माण करणारी आहे.
डॉक्टरांचा इशारा: AI डॉक्टरांचा पर्याय ठरू शकत नाही
या प्रकरणाने डॉक्टरांनाही धक्का बसला आहे. विशेषतः कोणतेही प्रिस्क्रिप्शन नसताना अशा उच्च-जोखमीच्या औषधांची विक्री कशी झाली, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
डॉक्टरांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, AI टूल्स माहिती देऊ शकतात, पण क्लिनिकल निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नाही. राष्ट्रीय मार्गदर्शक सूचनांनुसार HIV PEP उपचार सुरू करण्याआधी वैद्यकीय तपासणी, जोखीम, बेसलाइन चाचण्या आणि साइड इफेक्ट्सवर सतत लक्ष ठेवणे आवश्यक असते.
डॉक्टरांनी इशारा दिला की, आरोग्याशी संबंधित निर्णयांसाठी थेट AI प्लॅटफॉर्मवर अवलंबून राहणे धोकादायक असून, अशा वापरावर स्पष्ट नियम आणि नियंत्रण आणण्याची गरज आहे.
