पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, अटकेत असलेले दहशतवादी आणि लाल किल्ला स्फोटाचा आरोपी डॉ. उमर तुर्कीतल्या एका हँडलरच्या संपर्कात होते. या हँडरलचं नाव 'उकासा' UKASA असल्याचं समोर आलंय. 'उकासा' UKASA हे एक कोड नाव असू शकतं. अटकेत असलेले दहशतवादी हे सेशन Session या अॅपद्वारे हँडलरशी संपर्कात होते. हँडलरची लोकेशन तुर्कीतील अंकारा इथलं असल्याचं दिसून आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मार्च 2022 मध्ये भारतातून काही जण अंकाऱ्याला गेले होते आणि त्याच काळात त्यांचा ब्रेनवॉश करण्यात आलं असावं, असा गंभीर संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केलाय.
advertisement
खत विक्रेत्याची सखोल चौकशी
दिल्लीतील स्फोट प्रकरणाचा तपास आता हरियाणातील नूहपर्यंत पोहोचला आहे. फरीदाबादमध्ये जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांचा संबंध नूहमधील खत विक्रेत्याशी असल्याचं तपासात उघड झालं आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं नूह जिल्ह्यातील खत विक्रेता दिनेश अग्रवाल उर्फ डब्बू याला ताब्यात घेतलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपींनी याच ठिकाणावरून खत खरेदी करून त्यातून अमोनियम नायट्रेट तयार केलं असावं. सध्या तपास यंत्रणा खत विक्रेत्याची सखोल चौकशी करत आहेत.
दिल्लीतील स्फोटानंतर अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर
दिल्लीतील स्फोटानंतर घटनास्थळावरील अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते. त्यानंतर आता स्फोट झाला त्या क्षणाचं नवं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय. सोमवारी संध्याकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या परिसरात हा स्फोट झाला. त्याआधी ज्या कारमध्ये स्फोटके होती, ती आय 20 कार 3 वाजून 18 मिनिटांनी लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये दाखल झाली. त्यानंतर 6 वाजून 23 मिनिटांनी ही कार पार्किंगमधून निघाली आणि 6 वाजून 52 मिनिटांनी स्फोट झाला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्फोटापूर्वी रस्त्यावर नेहमीप्रमाणे वाहनांची गर्दी दिसतेय. हा स्फोट झाला तेव्हा सर्व वाहने सिग्नलवर थांबली होती. सिग्नल सुटल्यानंतर वाहने पुढे सरकत असतानाच अचानक हा स्फोट झाला होता. स्फोट झाल्यानंतर प्रचंड मोठा आवाज आणि आगीचा मोठा लोळ उठला. त्यानंतर कारच्या बाजूला असणाऱ्या रिक्षा आणि इतर गाड्यांची वाताहात झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, मृतांपैकी काहीजणांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाले होते. त्यांच्या शरीराचे तुकडे काही अंतरावर जाऊन पडले होते.
