मुंबई: एका तरुणाच्या साध्या कुटुंबातील प्रसंगाने संपूर्ण इंटरनेटला भावनिक अन् हसवून टाकलं आहे. IIT BHU मधून शिक्षण पूर्ण केलेल्या शिवांशु रंजनने जेव्हा आपल्या वडिलांना सांगितले की त्याला Amazon सारख्या मोठ्या कंपनीत नोकरी लागली आहे, तेव्हा सर्वांना अपेक्षा होती की वडिलांचा आनंद ओसंडून वाहेल. पण त्यांच्या मोबाईलवरून आलेलं उत्तर आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे. त्यांनी एका शब्दात दिलेलं हे उत्तर भारतीय पालकांच्या भावना दिसतात. जिथे अभिमान शब्दांत नाही, पण नजरेत आणि शांततेत दडलेला असतो.
advertisement
IIT BHUचा पदवीधर शिवांशु रंजन याला Amazon या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये SDE-1 (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनियर) म्हणून नोकरी मिळाली. त्याच्या या मोठ्या यशाची बातमी जेव्हा त्याने आपल्या वडिलांना सांगितली, तेव्हा त्यांचा प्रतिसाद इतका साधा आणि थंड होता की तो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
शिवांशुने आपल्या वडिलांना मेसेज केला- “Job lag gaya, Amazon me” (म्हणजेच, "अॅमेझॉनमध्ये नोकरी लागली!") त्याला अपेक्षा होती की वडिलांचा आनंद ओसंडून वाहेल, काहीतरी अभिमानाने भरलेलं उत्तर येईल. पण त्यावर वडिलांनी फक्त एक शब्द पाठवला “ok”.
हा ‘ok’ शब्द आता इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. Typical dad response after I got job या कॅप्शनसह शिवांशुने तो स्क्रीनशॉट X वर शेअर केला आणि लोकांनी तो हातोहात घेतला. अनेकांना हा अनुभव फारच “रिलेटेबल” वाटला कारण भारतीय पालकांच्या भावनांची अभिव्यक्ती नेहमीच थोडी संयमी, मितभाषी आणि वास्तववादी असते.
या पोस्टवर हजारो कमेंट्स आल्या. एका युजरने लिहिलं, तुमच्या वडिलांनी आयुष्यात सगळं पाहिलं आहे म्हणून त्यांना काही गोष्ट पटकन उत्साहित करत नाही. काही वर्षांनी तुमचाही प्रतिसाद असाच होईल. आपण लहानपणी एखादं खेळणं मागत रडायचो, पण ते मिळाल्यावर लगेच कंटाळा यायचा – तसंच काहीसं हे आहे.
दुसऱ्या युजरने लिहिलं, नव्या पिढीच्या कॉर्पोरेट नोकर्या पालकांसाठी अजूनही एक अनोळखी प्रदेश आहेत. माझे आईवडील आजही फक्त ‘Private job’ असं म्हणतात. त्यांच्या मते सरकारी नसेल, तर सगळ्या नोकऱ्या प्रायव्हेटच! एका तिसऱ्याने विनोदी पद्धतीने म्हटलं, हे फक्त भारतीय पालकांचं वैशिष्ट्य नाही, असाच प्रतिसाद एखादा जळणारा मित्रही देतो!
तर एका चौथ्या युजरने अगदी सुंदर शब्दांत लिहिलं, “त्या ‘ok’ मध्ये खूप भावना दडलेल्या आहेत. त्या व्हॉट्सअॅपमध्ये दिसत नाहीत. त्या ‘ok’ च्या मागे एक मोठं ‘congratulations’ आणि त्याहूनही मोठी वाट पाहणारी जीवनयात्रा लपलेली आहे. शिवांशु रंजनचा हा छोटा संवाद आज हजारो तरुणांना त्यांच्या घरच्या परिस्थितीशी जोडतो आहे. जिथे पालकांचं प्रेम आणि अभिमान शब्दांत कमी, पण अंतःकरणात अमर्याद असतं.
